कैफ़ी आज़मी यांची ओळख फक्त प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांचे वडील म्हणूनच नव्हे तर एक अतिशय प्रतिभाशाली कवी, गीतकार आणि गझलकार म्हणून आपल्या सगळ्यांना आहे. साहिर लुधयानवी, मजरुह, शैलेंद्र, शकील बदायुनी, राजेंद्रकृष्ण, आनंद बक्षी यांसारख्या प्रसिद्ध गीतकारांमध्ये कैफ़ी आज़मी यांचे स्थान आहे. कैफ़ी आज़मी यांचे नाव घेतले की डोळ्यांसमोर येतात ते दोन वेगळे चेहरे - एक चेहरा म्हणजे समाजातील विषमता, धर्मांधता आणि स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध ठामपणे लिहिणारा बंडखोर कवी आणि दुसरा हळुवार प्रेमभावनांना नाजूक शब्दांत मांडणारा हळवा गझलकार ! त्यांच्या गझलात या दोन्ही रूपांचा सुंदर संगम दिसून येतो.
कैफ़ी आज़मी यांचे मूळ नाव अतहर हुसैन रिज़वी. उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील मिजवाँ या गावी एका जमीनदार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना शायरीची आवड होती आणि वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्यांनी आपली पहिली गझल लिहिली -
'इतना तो ज़िंदगी में किसी के ख़लल पड़े.'
या गझलेने त्यांना एका मुशायऱ्यात एवढी प्रसिद्धी मिळवून दिली की सुरुवातीला उपस्थितांचा विश्वासच बसेना की एवढा लहान मुलगा इतकी प्रगल्भ शायरी लिहू शकतो. वडिलांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक ओळ देऊन त्याच वृत्तात व यमकात संपूर्ण गझल लिहायला सांगितली, आणि कैफ़ी यांनी ते आव्हान लीलया पेलले. पुढे हीच गझल जगप्रसिद्ध गायिका बेगम अख़्तर यांनी गायली आणि अविभाजित भारतात लोकप्रिय झाली. आजही ही गझल वाचली तर आश्चर्यचकित करून जाते.
'इतना तो ज़िंदगी में किसी के ख़लल पड़े
हँसने से हो सुकून न रोने से कल पड़े
जिस तरह हँस रहा हूँ मैं पी पी के गर्म अश्क
यूँ दूसरा हँसे तो कलेजा निकल पड़े
मुद्दत के बा'द उस ने जो की लुत्फ़ की निगाह
जी ख़ुश तो हो गया मगर आँसू निकल पड़े'
आयुष्यात कुणावरही इतके प्रेम करू नये की, तिच्या आठवणीमुळे मन सतत अस्वस्थ राहील. मी माझं दुःख लपवून हसतो आहे. पण दुसऱ्या कुणाला असंच हसताना पाहिलं, तर त्याच्या मागचं दुःख मला जाणवेल.
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ते कम्युनिस्ट पक्षात सामील झाले आणि पक्षाच्या 'क़ौमी जंग' या वृत्तपत्रासाठी लेखन करू लागले. पुढे ते मुंबईत स्थायिक झाले. साहित्याचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी व्हावा, यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि याच भूमिकेतून त्यांनी जातीयवाद, धार्मिक कट्टरता आणि स्त्रियांच्या हक्कांविषयी अनेक कविता लिहिल्या.
कैफ़ी आज़मी यांच्या अनेक गझला प्रसिद्ध आहेत. यातील काही अत्यंत लोकप्रिय व वारंवार गायल्या-ऐकल्या जाणाऱ्या गझला पुढीलप्रमाणे -
प्रेमातील हळुवार व्याकुळतेचा उत्कृष्ट नमुना मानली जाणारी ही गझल जगजीत सिंह यांच्या स्वरांमुळे घराघरांत पोहोचली आहे.
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्या ग़म है जिस को छुपा रहे हो
आँखों में नमी हँसी लबों पर
क्या हाल है क्या दिखा रहे हो
रेखाओं का खेल है मुक़द्दर
रेखाओं से मात खा रहे हो
शेवटच्या कडव्यात तर आपले नशीब स्वतःलाच बनवावे लागते आणि त्यासाठी कुठल्या ज्योतिष्याची गरज नाही, हा मोलाचा संदेश त्यांनी दिला आहे. आपल्या बहिणाबाईंनी 'नही नशीब नशीब, तय हाताच्या रेघोट्या' असे जे म्हटले आहे, तसाच हा पण संदेश आहे. अजून एक अशीच प्रेमिकेच्या नजरेतील अनिश्चिततेचे व अंतर्मनातील अस्वस्थतेचे चित्रण करणारी ही मुख़्तसर गझल -
'झुकी झुकी सी नज़र बे-क़रार है कि नहीं
दबा दबा सा सही दिल में प्यार है कि नहीं
तू अपने दिल की जवाँ धड़कनों को गिन के बता
मिरी तरह तिरा दिल बे-क़रार है कि नहीं
तिरी उमीद पे ठुकरा रहा हूँ दुनिया को
तुझे भी अपने पे ये ए'तिबार है कि नहीं'
आदर्श व वास्तव यांतील दाहक अंतराची जाणीव करून देणारी ही तात्त्विक गझल बघा -
'मैं ढूँडता हूँ जिसे वो जहाँ नहीं मिलता
नई ज़मीन नया आसमाँ नहीं मिलता
नई ज़मीन नया आसमाँ भी मिल जाए
नए बशर का कहीं कुछ निशाँ नहीं मिलता'
आपण नेहमी एका नव्या आणि अधिक चांगल्या जगाच्या शोधात असतो, परंतु जोपर्यंत माणूस स्वतःच बदलत नाही , तोपर्यंत असे चांगले जग खऱ्या अर्थाने अस्तित्वात येऊ शकत नाही. इतका गहिरा संदेश त्यांनी या गझलेत दिला आहे.
'वो तेग़ मिल गई जिस से हुआ है क़त्ल मिरा
किसी के हाथ का उस पर निशाँ नहीं मिलता'
ज्या खंजिराने माझा खून झाला तो तर मिळाला, पण त्यावर कुणाच्या हाताचे ठसे मिळाले नाहीत. याचा अर्थ असा की दुःख कशामुळे झाले हे कळते, पण ते दुःख देणारा नेमका कोण आहे किंवा दोष कुणाचा आहे, हे आपल्याला कधीच कळत नाही. अशा ओळी एखादा भावनाशील, सहृदय कवीच लिहू शकतो. अशीच माझी एक आवडती गझल म्हणजे - 'मिले न फूल तो काँटों से दोस्ती कर ली!' ही नितांत सुंदर गझल मोहंमद रफी यांनी 'अनोखी रात' या चित्रपटात अत्यंत तरलपणे गाऊन अजरामर केली आहे. ही गझल इतकी सुंदर आहे की पूर्णपणे येथे देण्याचा मोह आवरत नाही.
'मिले न फूल तो काँटों से दोस्ती कर ली
इसी तरह से बसर हम ने ज़िंदगी कर ली
अब आगे जो भी हो अंजाम देखा जाएगा
ख़ुदा तलाश लिया और बंदगी कर ली
नज़र मिली भी न थी और उन को देख लिया
ज़बाँ खुली भी न थी और बात भी कर ली
वो जिन को प्यार है चाँदी से इश्क़ सोने से
वही कहेंगे कभी हम ने ख़ुद-कुशी कर ली'
जीवन कसे जगावे याचा सुंदर वस्तुपाठच या गझलेत आहे. जर आयुष्याने तुम्हाला फुले दिली नाहीत, तर काट्यांसोबत जगायला शिका. तुमच्या आयुष्याचा अर्थ स्वतःच शोधा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. ज्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे त्यासाठी जीव तोडून प्रयत्न करा. नाती आणि जिव्हाळ्याचे बंध जीवापाड जपा. पण ज्यांना प्रत्येक गोष्ट पैशानेच मोजण्याची सवय आहे, अशा लोकांपासून दूर राहा.
कैफ़ी आज़मी यांच्या गझलांचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक गझलेतील प्रेम, विरह आणि सौंदर्याचे विषय हाताळताना त्यांनी भाषेतील साधेपणा व भावनांतील प्रामाणिकपणा कधीही सोडला नाही. क्लिष्ट शब्दांपेक्षा त्यांनी साधी सरळ, थेट हृदयाला भिडणारी भाषा वापरली. त्यामुळे त्यांच्या गझला सर्वसामान्य रसिकांपर्यंतही सहज पोहोचल्यात. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रेमकवितेतही सामाजिक जाणिवेचा सूक्ष्म धागा त्यांनी नेहमी कायम ठेवला - प्रेम हे केवळ वैयक्तिक भावना न राहता, ते माणुसकीच्या व्यापक अनुभवाशी त्यांनी जोडलेले दिसते. त्यांच्या अनेक प्रसिद्ध शेरांमध्येही हाच सूर दिसतो. उदाहरणार्थ -
'इंसाँ की ख़्वाहिशों की कोई इंतिहा नहीं
दो गज़ ज़मीं भी चाहिए दो गज़ कफ़न के बाद'
माणसाच्या इच्छांना कधीच अंत नसतो, हे सांगताना मृत्यूनंतरही माणसाला फक्त दोन गज जमीन हवीच असते, असा अगदी परखड विचार यामागे आहे. तसेच हिंदू-मुस्लीम ऐक्याचा अभाव आणि त्यातून होणारी माणुसकीची हानी, याबद्दल त्यांनी लिहिलेला हा सुंदर शेर पहा. आजच्या परिस्थितीतही हा खरा वाटतो. -
'बस्ती में अपनी हिन्दू मुसलमाँ जो बस गए
इंसाँ की शक्ल देखने को हम तरस गए'
माणूस बघण्यासाठी मी आतुर झालो आहे, पण मला तर येथे फक्त वेगवेगळ्या धर्माचे उपासकच दिसतात.
माणसं जातात, शहरेही जातात; या जगात स्थायी काहीच नाही. फक्त आठवणी आणि काळाचा प्रवाह राहतो, हे ते मोजक्या शब्दात सांगून जातात -
'रोज़ बस्ते हैं कई शहर नए
रोज़ धरती में समा जाते हैं'
कैफ़ी आज़मी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठीही विपुल लेखन केले. काग़ज़ के फूल, शमा, शोला और शबनम, अनुपमा, आख़िरी ख़त, हक़ीक़त, हँसते ज़ख़्म, अर्थ यांसारख्या चित्रपटांतील त्यांची गीते आजही रसिकप्रिय आहेत.
'अनुपमा' या चित्रपटातील हेमंत कुमार यांनी गायलेले हे गीत म्हणजे कैफ़ी आज़मी यांची डोळ्यांत पाणी आणणारी एक अप्रतिम गझल!
'या दिल की सुनो दुनिया वालो या मुझ को अभी चुप रहने दो
मैं ग़म को ख़ुशी कैसे कह दूँ जो कहते हैं उन को कहने दो
इक ख़्वाब ख़ुशी का देखा नहीं देखा जो कभी तो भूल गए
माँगा हुआ तुम कुछ दे न सके जो तुम ने दिया वो सहने दो
क्या दर्द किसी का लेगा कोई इतना तो किसी में दर्द नहीं
बहते हुए आँसू और बहें अब ऐसी तसल्ली रहने दो'
आजच्या जगात इतकी उदासीनता, इतका स्वार्थ पसरला आहे की कुणाचेही दुःख खऱ्या अर्थाने आपलेसे करून घ्यायला, ते वाटून घ्यायला कुणीच तयार नाही. आपण इतके बधीर, संवेदनाहीन झालो आहोत की दुसऱ्याच्या वेदनांचा आपण विचारही करत नाही.
कैफ़ी आज़मी यांना पद्मश्री, साहित्य अकादमी फेलोशिप, साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, उत्तर प्रदेश शासनाचा यश भारती पुरस्कार, सोविएत लँड नेहरू पुरस्कार तसेच आफ्रो-आशियाई लेखक संघाचा लोटस पुरस्कार यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. पूर्वांचल विद्यापीठ, आग्रा विद्यापीठ आणि शांतिनिकेतनच्या विश्वभारती विद्यापीठासह अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली होती. झंकार, आख़िर-ए-शब, आवारा सज्दे, सरमाया आणि त्यांच्या समग्र काव्याचा संग्रह असलेले 'कैफ़ियात' ही त्यांची उल्लेखनीय पुस्तके आहेत.
कैफ़ी आज़मी यांच्या गझला या केवळ प्रेमाच्या हळुवार अभिव्यक्ती नसून, त्या एका संवेदनशील, सामाजिक भान असलेल्या कवीच्या मनाचा आरसा आहेत. अकराव्या वर्षी सुरू झालेला हा काव्यप्रवास पुढे चित्रपटगीते, नज़्म आणि पटकथालेखनापर्यंत विस्तारला. तरी त्यांच्या गझलांतील माणुसकीचा, प्रामाणिकपणाचा आणि सामाजिक जाणिवेचा सूर कधीही ढळला नाही. आजही त्यांच्या गझला रसिकांच्या मनात तितक्याच ताज्या आणि जिवंत आहेत.
२००२ साली हा महान कवी हे जग सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेला, पण त्यांच्या गझलांवर, कवितांवर प्रेम करणारे लाखो रसिकांना आजही असे वाटते की,
'रहने को सदा दहर में आता नहीं कोई
तुम जैसे गए ऐसे भी जाता नहीं कोई'
या जगात कायमचे राहण्यासाठी कोणीच येत नाही; मृत्यू हे तर जीवनाचे सत्य आहे हे आम्हाला माहिती आहे. पण तुमच्या जाण्याने जे दुःख, जी पोकळी निर्माण झाली, ती कधीच भरून येणार नाही.
______________________________________________
संदर्भ :
१.
https://www.rekhta.org
२.
azmikaifi.com
....................................................................................
.

No comments:
Post a Comment