दोन गझला : डॉ.सुनंदा शेळके




१. 

 

प्रेमाने तू हाक जराशी मार एकदा 

हृदयाचे अन् उघड जरासे दार एकदा.


आवेगाने ये जवळी अन् खुशी-खुशीने 

तुझ्या करांचा घाल सुगंधी हार एकदा. 


डुंबून घे ना डोळ्यांच्या डोहात जरा अन् 

या हृदयाची छेड जराशी तार एकदा. 


आनंदाच्या लाटांवरती स्वार होउनी 

मिळून जाऊ क्षितिजाच्याही पार एकदा. 


हलका-हलका होउन जाशिल पिसापरी तू

पहा टाकुनी विश्वासाने भार एकदा.


२.


वादळातही कधीच नाही विझल्या गझला

सुचले नाही काही तेव्हा सुचल्या गझला.


पुनवच असते सदैव हृदयी बहरुन म्हणुनी

चांदरसातच सदैव माझ्या भिजल्या गझला.


अवती-भवती जरी दाटले हेवे-दावे

प्रेम-जिव्हाळा यातच माझ्या रुजल्या गझला.


तिने जाणले काळिज माझे माणुस होउन

पुसून अश्रु तेव्हा माझ्या हसल्या गझला.


सामान्यांच्या भाव-भावना मांडत गेले

म्हणून माझ्या रसिकांनाही भिडल्या गझला.


काळोखाला सारायाची ताकद त्यांची

मला उजळण्यासाठी माझ्या जळल्या गझला.


आनंदाचा झरा गवसला तिच्या आत मज

म्हणून मीही झोकुन देउन म्हटल्या गझला.

..................................................................

No comments: