'काळजी का वाटते इतकी उद्याची सांगा
या 'उद्या' नंतर पुन्हा येणार
'परवा' आहे'
मानवी जीवन नियंत्रित करणाऱ्या अनिश्चितता, सकारात्मकता व क्षणभंगुरता या तिन्हीही अदृश्य घटकांना एकाच मालिकेत गुंफणारा हा शेर आहे प्राजक्ता पटवर्धन या प्रतिभावंत कवयित्रीचा. तिचा 'निव्वळ योगायोग' हा संग्रह नुकताच प्रकाशित झाला असून उपरोल्लेखित शेर त्यातीलच आहे.
'निव्वळ योगायोग' वाचताना तंद्री लागते; फ्रेश व टवटवीत रचना आहेत व वाचकाचा मूड पण अगदी तस्साच बनून जातो. संपूर्ण संग्रह उत्कंठावर्धक आहे. रटाळपण अजिबात जाणवत नाही.
त्यातील कांहीं रचना व बरेचसे शेर 'स्वतंत्र लेखाचा विषय' होऊ शकतील या उंचीचे आहेत. संग्रहाला संगीता जोशी आणि माधव भागवत यांच्या अभ्यासपूर्ण –स्वतंत्र– प्रस्तावना आहेत.दोन्हीही प्रस्तावना आणि कवयित्रीने वाचकांशी साधलेला 'सुसंवाद' यात ज्या शेरांचा उल्लेख आहे ते तर masterpieces आहेतच.
परंतु, त्या व्यतिरिक्त मला आवडलेले शेर व माझ्या दृष्टीने कवयित्रीने हाताळलेल्या एकदम वेगळ्या कल्पना इथे मला सर्वांशी शेअर कराव्याशा वाटतात.
सर्वसामान्यांच्या नित्य परिचयातील घटना/ बाबी जेंव्हा कवी/ कवयित्री शब्दांत बांधून त्यांना एक वेगळीच कलाटणी देतो / देते तेंव्हा ती कलाकृती चोखंदळ रसिक अगदी डोक्यावर घेतात. उदा. प्राजक्ताचा हा शेर बघा –
'ती तशी दगडांपरी ना वागते ताठ्यात म्हणुनी
लागुनी चपलांस माती पोचते आहे घरोघर'
साधी घटना पण त्यातून मांडलेली शिकवण लाख मोलाची आहे. 'महापुरे झाडे जाती' या संतवचनाचा दृश्यानुभव इथे येतो.
'तुझ्या जखमांवरी नाही मिळाली औषधी तर मग
जखम तू वेगळीशी आणखी वर चोळ एखादी'
'लोहा लोहेको काटता हैं।' असे आपण सर्रासपणे म्हणतो,त्याचेच हे जणू मराठी काव्यरूप.
त्याच्याच पुढील शेर आहे –
'तुला जाणायचे,कविता कशी होते अशी गहिरी ?
जुनीशी वेदना तू घाल करुनी कोळ,एखादी'
'जखमेवर जखम चोळणे' व वेदना 'कोळणे'... सुपर्ब...अनेकांना – विशेषतः नव्या पिढीला 'कोळणे' हा शब्द व ही 'क्रिया' माहीत आहे की नाही,हा संशोधनाचा विषय असावा...लेखनात ज्याप्रमाणे नवीन शब्दांचा अविष्कार स्वागतार्ह आहे तेवढेच मोलाचे आहे जुन्या संकल्पना समोर आणणे.
'कोवळ्याशा पालवीला जन्म देताना
झाड का बघते कधी पंचांग कोठेही ?'
सृजनासाठी कुठलाही मुहूर्त बघण्याची आवश्यकता नाही.किंबहुना,नवनिर्मिती म्हणजेच जणू एक 'युगारंभ' असतो,हा एक मोलाचा संदेश यातून दिलेला आहे. यातील आणखी एक शेर तर अगदीच क्लासिक या सदरात मोडेल –
'वेगळेपण रंग अन् गंधातले केवळ
फूल का असते कधी
'दिव्यांग' कोठेही?'
माणसाने आपापल्या fixed mindset द्वारे आपल्याच मनाने कांहीं व्याख्या ठरवलेल्या असतात. त्यांना छेद देत 'Different doesn't mean disabled or inferior' या विचारसरणीस हा शेर पुष्टी देतो.कवयित्रीचे वेगळ्या अंगाने विचार करणे इथे प्रकर्षाने जाणवते.
आणखी एक शेर मला इथे उद्धृत करावासा वाटतो :
'तुझे हे मौन देते फक्त इतका त्रास आताशा
जसा हातास लावावा चुलीवरचा तवा कोणी'
साध्या–सोप्या शब्दांत व दैनंदिन आयुष्यातील घटनांद्वारे एखादी अनुभूती वाचकांपर्यंत पोचवणे,याचे हे उत्तम उदाहरण आहे.या निमित्ताने एक आठवण...एक वेगळा संदर्भ.
१९८० मध्ये फिरोज खानचा
'कुर्बानी' हा सुपरहिट सिनेमा प्रदर्शित झाला होता.त्यातील सर्वच गाणी कमालीची लोकप्रिय झाली होती. त्यापैकीच इंदीवर यांनी लिहिलेले 'हम तुम्हे चाहते है ऐसे...' हे गीत आठवतं?
'हम तुम्हे चाहते है ऐसे
मरनेवाला कोई जिंदगी चाहता हो जैसे'
एखाद्याच्या प्रेमाचे यापेक्षा मोठे आणि व्यापक मोजमाप दुसरे कुठले असू शकेल? अगदी त्याचप्रमाणे एखाद्याचे 'मौन' म्हणजे 'चुलीवरील तव्याचा स्पर्श' याहून तीव्र दुसरे कोणते उदाहरण असू शकेल?
असाच एक वेगळा शेर –
'दुखणे होईल कमी जरा ह्या आयुष्याचे दुःखा
पाठीवर दे पाय तुझा होऊन जरा पायाळ'
व्वा! मी तर निःशब्द झालो हा शेर वाचल्यावर. मुख्यतः
'पायाळू' ही concept आणि त्याचे 'पाठीवर पाय देणे' हा प्रकार हल्ली अगदी खेड्यापाड्यातून देखील जणू हद्दपार होत आला आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या नव्या पिढीला आपल्या रूढी, परंपरा, चालीरीती यांसोबतच गतकाळातील काही बाबी माहीत असणे आवश्यकच आहे.ज्यांना 'पायाळू' म्हणजे काय हे माहीत असेल, त्यांच्या आठवणींना या शेराने उजाळा मिळाला असेल आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी ते नक्की माहीत करून घ्यावे, म्हणजे या शेरात दडलेली गहनता समजणे सोपे जाईल.
कधी–कधी/ खूपदा कवी काहीतरी सहज लिहून जातो पण त्यातून एक फार मोठे तत्त्वज्ञान जगासमोर मांडले जाते,कदाचित त्याची कल्पना खुद्द त्या कवीला पण नसते.असाच काहीसा भास मला पुढील शेर वाचताना झाला :
'वादळ सांगत फिरते आहे
तुझी समुद्रा म्हणे कहाणी'
काय बोलावे या शेराबद्दल! समुद्राने ( खरे तर वादळामुळे उठलेल्या लाटांनी ) वादळाची कहाणी सांगणे हे एकवेळ आपण समजू शकतो. पण, वादळाचे समुद्राची कहाणी सांगत फिरणे म्हणजे अगदी अशक्य वाटावी,अशीच घटना आहे. यातील ट्विस्ट वाचकाला अचंबित करणारे आहे.
'येथेच लाव चंदन बागेमध्ये तुझ्या तू
बघ दरवळून जाईल ही टाकळी कदाचित'
असा एक शेर यात आढळला. मुळात बहुतेकांना 'टाकळी' हा नेमका काय प्रकार आहे , याचेच confusion होण्याची शक्यता आहे. ही एक दुर्लक्षित पण बहुगुणी औषधी वनस्पती असते. तिचे भाग्य या शेरात उजाडले असे म्हणण्यास वाव आहे. असे मी गंमतीने म्हणेन. Your company decides your present as well as future हे personality development मध्ये आपण सांगतो / ऐकतो त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा शेर होय.
एखादी ओळ वाचल्यावर त्यातून एखादा नवा विचार जर दिला जात असेल तर ते त्या रचनेचे यश असते. हा शेर बघा :
'सोहळा सळसळ करुनी साजरा केला
शुष्क फांदीने चिमुकले पान आल्यावर'
'सळसळ' म्हणजे 'सोहळा' ...सुंदरच!
विचारांना 'नवी दिशा' देणारा विचार. प्रत्येकाची celebration ची व्याख्या वेगळी असते आणि ते करण्याची पद्धत किती वेगळी असू शकते,याचे फार समर्पक आणि सुंदर उदाहरण यानिमित्ताने वाचकांसमोर आले आहे.
आणखी एका शेरात 'आंबूस' हा शब्द कमालीच्या चपखलतेने वापरला आहे. शब्द नेहमीचेच... बोलीभाषेत रुळलेले... पण,त्यांना काव्याच्या साच्यात बसवायला प्रतिभाच हवी असते.
'व्यथा जखमा तुझ्या झाल्या
किती आंबूस आयुष्या'
क्षेत्र कुठलेही असो, 'संयम' ही यशाची मूलभूत गरज मानली जाते. संयमाची व्याख्या अनेकांनी अनेक वेळा अनेक प्रकारे केलेली आहे. आपणही प्रत्येकजण वेळोवेळी करतोच. पण, एका शेरात प्राजक्ताने जे भाष्य केले आहे व संयमाची एक नवी व्याख्या दिली आहे,तिला तर तोडच नाही-
'संयमाला नाव द्यावे कोणते?
चल, तुझ्यामाझ्यातले अंतर म्हणू !'
'वेगळी दृष्टी' लाभते हा शेर वाचून. हल्ली सर्वत्र नातेसंबंधात जो ताणतणाव जाणवतो आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे 'या' दृष्टीचा अभाव,असे मला वाटते. ती जर प्रत्येकाला लाभली तर मानवी जीवन अधिक सुखकर होईल.
लेखन खूपच लांबले आहे पण, यातील आणखी दोन (अगदी शेवटच्याच) शेरांचा उल्लेख करण्याचा मोह मला टाळता येत नाहीये.
'कथा सांगते माझे मजला
जीवन माझे झाले कुशलव'
लव आणि कुश यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना (आपल्या पित्याला) रामायण सांगितले होते.
'स्वये श्रीरामप्रभू ऐकती
कुशलव रामायण गाती'
हे आपण सर्वजण जाणतोच. या संदर्भाने जर आपण प्राजक्ताचा वरील शेर वाचला तर त्याला अर्थाचे किती धुमारे फुटतील! पौराणिक घटनांचा अनुबंध वर्तमानाशी जोडणारे जे मोजके शेर माझ्या वाचनात आजवर आलेले आहेत, त्या यादीत भर पडली आहे.
आणि अगदी शेवटचा शेर... अनेक कीर्तन, प्रवचनांतून मांडलेला पण, अजूनही अनेकांच्या ( निदान माझ्या तरी ) डोक्यात न आलेला विचार...अगदी साध्या व सोप्या पद्धतीने बघा कसा मांडलेला आहे :
'ती जरी संतापुनी बोलायची त्याला तसे
विठ्ठलाला माउली वाटायची ती आवली'
आवली आणि विठूमाऊली यांचे 'सख्य' सर्वज्ञात आहे. तिच्या मते 'काळतोंड्या' असलेला तो म्हणजे जगाची माउली आहे, आणि ती
माउली ( इतका तिरस्कार पचवून देखील ) हिला माउली मानते आहे.भक्ती आणि समर्पणाचे जे अद्वैत यातून कवयित्रीने उभे केले आहे, ते केवळ अप्रतिम.
हा शेर वाचल्यावर एक विचार नक्कीच मनात येतो की आपल्यापैकी जवळपास सर्वच जण–थोड्याबहुत फरकाने का होईना पण– आपापल्या जीवनातील either आवली असतो or विठूमाऊली.... पण, त्या दोघांमधील जे व जसे नाते होते तसे नाते आपल्याला सांभाळता येते का? मुद्दा प्रत्येकाने विचार करण्यासारखा आहे.असो.
संग्रहातील 'शुष्क ढग', 'स्वप्नांची ऊठबस' व 'छापील पावसाळा' हे ३ शब्दसमुच्चय एखाद्या पुस्तकाचे शीर्षके ठरावे ,असे आहेत किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर 'ही' शीर्षके ठरवून नवे लेखन सुरू करण्यास हरकत असावी,असे ( अनाहूतपणे ) सुचवावेसे वाटते. चिंतन केल्यास त्यांना अनुरूप विषय नक्कीच सापडतील.
दोन प्रस्तावना व वैशाली सामंतची पाठराखण संग्रहाच्या जमेच्या बाजू आहेत. 'ग्रंथयुग प्रकाशन' ने निर्मितीमूल्यात कुठलीच कमतरता ठेवली नाही. कागद,फाँट,छपाई,बांधणी सर्वच उत्तम. साजेसे मुखपृष्ठ व आकर्षक मांडणी संग्रहाच्या सौंदर्यात भर घालते.
संग्रहाचे नाव जरी 'निव्वळ योगायोग' असला तरी या निमित्ताने मराठी साहित्यात
'अगदी ठरवून' भर घातली जाईल असे मला वाटते.
माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!
____________________________________________
●निव्वळ योगायोग
●प्राजक्ता पटवर्धन
●ग्रंथयुग प्रकाशन,ठाणे
●पृष्ठे १०४
● किंमत ₹ २५०/-
...................................................................................

No comments:
Post a Comment