मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेत विविध काव्यप्रकारांनी आपापले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अभंग, ओवी, भारूड, लावणी, पोवाडा, मुक्तछंद, भावगीत यासोबतच गझल या काव्यप्रकारानेही मराठी रसिकांच्या मनावर आपली वेगळी छाप पाडली आहे. गझल म्हटले की प्रेम, विरह, वेदना, एकटेपण, जीवनाचे तत्त्वज्ञान, सामाजिक वास्तव आणि मनातील सूक्ष्म भावनांचे नाजूक चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. म्हणजेच गझल मानवी मनाच्या अनेक पदरांना स्पर्श करणारी प्रभावी काव्यशैली आहे हे आपण विसरता कामा नये. गझल म्हणजे काय? याचा विचार करत असताना ‘गझल’ हा अरबी भाषेतील शब्द मानला जातो हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. पुढे तिचा विकास फारसी आणि उर्दू साहित्यात मोठ्या प्रमाणावर झाला. सुरुवातीला प्रेमभावना, प्रणय, विरह आणि प्रियकर-प्रेयसीच्या भावविश्वाभोवती गझलेचे लेखन होत असे. कालांतराने गझलेने आपल्या विषयांची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढवली.
गझलेतील दोन ओळींच्या स्वतंत्र काव्यघटकाला ‘शेर’ म्हणतात. गझल ही मुख्यतः स्वतंत्र शेरांची रचना असते. प्रत्येक शेर हा अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असू शकतो; तरी संपूर्ण गझलेत एक समान भावछटा किंवा वातावरण जाणवते. दोन ओळींत एखादा अनुभव, एखादी वेदना, एखादा विचार किंवा जीवनाचे एखादे गूढ सत्य व्यक्त करता येते. गझलेचे सौंदर्य तिच्या लहानशा आकारात मोठा अर्थ सामावण्याच्या क्षमतेत आहे.
गझलेचा उगम अरबी काव्यपरंपरेत झाला. पुढे ती फारसी साहित्यात विकसित झाली आणि फारसी कवींच्या प्रतिभेमुळे गझलेला कलात्मक परिपूर्णता प्राप्त झाली. त्यानंतर गझल उर्दू साहित्यात आली आणि उर्दू भाषेतील सर्वाधिक लोकप्रिय काव्यप्रकारांपैकी एक बनली. मीर तकी मीर, मिर्झा गालिब, बहादूरशहा जफर, फैज अहमद फैज यांसारख्या अनेक कवींनी गझलेला समृद्ध केले. त्यांच्या गझलांमधून प्रेम, विरह, सामाजिक परिस्थिती, राजकीय वास्तव, मानवी संघर्ष आणि जीवनाचे तत्त्वज्ञान प्रभावीपणे व्यक्त केले.
भारतीय भाषांमध्ये गझलेचा प्रभाव वाढत गेला. मराठी भाषेनेही या काव्यप्रकाराला आपलेसे केले. मराठीच्या स्वभावाला अनुरूप अशी शब्दरचना, भावविषय आणि आशय स्वीकारून मराठी गझलेने स्वतंत्र ओळख निर्माण केली.
गझलेची रचना वेगळ्या धाटणीची असून काही विशिष्ट घटकांवर आधारलेली असते. त्यातील प्रमुख घटक म्हणजे- शेर, मतला, मक्ता, रदीफ, काफिया वृत्त किंवा छंद. गझलेतील दोन ओळींच्या स्वतंत्र घटकाला ‘शेर’ म्हणतात. शेराच्या पहिल्या ओळीला ‘मिसरा-ए-उला’ आणि दुसऱ्या ओळीला ‘मिसरा-ए-सानी’ असे म्हटले जाते. शेराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्वतंत्र अर्थ. गझलेतील प्रत्येक शेर स्वतंत्रपणेही प्रभाव पाडू शकतो. गझलेतील पहिल्या शेराला ‘मतला’ म्हणतात. मतल्यातील दोन्ही ओळींच्या शेवटी काफिया आणि रदीफ येतात. गझलेतील शेवटच्या शेराला ‘मक्ता’ म्हणतात. पारंपरिक गझलेत कवी स्वतःचा ‘तखल्लुस’ म्हणजे काव्यनाम या शेरात वापरत असे. आधुनिक मराठी गझलेत हा नियम बंधनकारक राहिलेला नाही. गझलेतील प्रत्येक संबंधित शेराच्या शेवटी शब्दशः किंवा जशास तसा पुनरावृत्त होणारा शब्द किंवा शब्दसमूह म्हणजे रदीफ. उदाहरणार्थ, एखाद्या गझलेत प्रत्येक शेराच्या शेवटी ‘आठवते’ हा शब्द पुन्हा पुन्हा येत असेल तर ‘आठवते’ हा रदीफ होऊ शकतो. रदीफच्या आधी येणारे यमक साधणारे शब्द म्हणजे काफिया. काफियामुळे गझलेला लय, नाद आणि संगीतात्मकता प्राप्त होते. काफिया आणि रदीफ हे गझलेच्या बांधणीतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत गझलेला विशिष्ट लय आणि ताल देण्यासाठी वृत्ताचा वापर केला जातो. गझल लिहिताना प्रत्येक शेरातील मात्रांची किंवा अक्षरांची रचना ठरावीक पद्धतीने राखली जाते ती वृत्तामुळे. त्यामुळे गझल म्हणताना तिच्यात एकसंध लय जाणवते. गझलकाराने आशयाबरोबरच छंद, मात्रा, काफिया आणि रदीफ यांचा विचार करणे आवश्यक असते.
गझलेची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
भावनांची तीव्रता :
गझलेत भावना अत्यंत संक्षिप्त पण प्रभावी पद्धतीने व्यक्त केल्या जातात. प्रेम, विरह, आठवण, वेदना, आनंद, अस्वस्थता, अपेक्षा, निराशा अशा भावनांना गझल सहजपणे सामावून घेते.
सूचकता :
गझल सरळ विधान करण्यापेक्षा अनेकदा सूचकतेचा आधार घेते. दोन ओळी वाचल्यानंतर त्यामागील अर्थाचा विचार करण्यास रसिकाला भाग पाडणे हे गझलेचे मोठे सामर्थ्य आहे.
आशयाची खोली :
गझल छोटी असली तरी त्यातील आशय मोठा असतो. एखादा शेर वाचताना साधा वाटतो; परंतु पुन्हा पुन्हा वाचल्यावर त्यातील वेगळे अर्थ उलगडत जातात.
नादमाधुर्य :
वृत्त, काफिया आणि रदीफ यांमुळे गझलेत संगीतात्मकता निर्माण होते. त्यामुळे गझल ऐकतानाही ती मनाला भिडते.
प्रतिमांचा वापर :
चंद्र, पाऊस, रात्र, वाट, दिवा, सावली, वारा, नदी, आकाश, फुले अशा प्रतिमांच्या माध्यमातून गझलकार भावनांना सुंदर आकार देतो.
गझल आणि प्रेम :
गझलेचा आणि प्रेमाचा संबंध अतिशय जुना आहे. प्रेमातील आनंद, प्रतीक्षा, विरह, भेट, आठवण, गैरसमज, ताटातूट आणि अपूर्णता या भावनांना गझलेने नेहमीच आपल्या कवेत घेतले आहे. परंतु गझलेतील ‘प्रेम’ केवळ प्रियकर-प्रेयसीपुरते मर्यादित नसते. त्यात माणसाचे माणसावरचे प्रेम, मातृभूमीवरील प्रेम, निसर्गावरील प्रेम, जीवनावरील प्रेम आणि माणुसकीची ओढही त्यातून व्यक्त होत असते.
गझल आणि विरह :
विरह हा गझलेचा अत्यंत जवळचा विषय आहे. एखाद्या व्यक्तीची अनुपस्थिती, तिची आठवण आणि तिच्या प्रतीक्षेत जगणारे मन या सगळ्यांचे भावविश्व गझलेतून अत्यंत परिणामकारकपणे व्यक्त होते. ‘जवळ असूनही दूर असणे’ किंवा ‘दूर असूनही मनात सतत जवळ असणे’ अशा विरोधाभासी भावनांना गझल विशेष ताकदीने मांडते.
गझल आणि जीवनदर्शन :
आधुनिक गझल केवळ प्रेम-विरहापुरती राहिलेली नाही. आजच्या गझलेत जीवनातील संघर्ष, माणसाचे बदलते नाते, स्वार्थ, एकटेपणा, सामाजिक विषमता, राजकीय वास्तव, गरिबी, शहरातील ताणतणाव, माणुसकीचा ऱ्हास आणि बदलते मूल्यविश्व यांचेही दर्शन घडते. त्यामुळे गझल ही केवळ भावकविता न राहता मानवी जीवनावर भाष्य करणारा काव्यप्रकार बनली आहे.
मराठी गझलेचा प्रवास आणि सुरेश भट :
मराठी भाषेत गझलेचा प्रवास फारसी आणि उर्दू परंपरेतून झाला. मात्र पुढे काही कवींनी या काव्यप्रकाराला मराठी भाषेच्या स्वभावाशी जोडले. मराठी गझलेच्या विकासात सुरेश भट यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्यामुळे मराठी गझलेला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. त्यामुळे त्यांना ‘मराठी गझलेचे गझलसम्राट’ किंवा ‘मराठी गझलेचे जनक’ अशा विशेषणांनी गौरवले जाते. सुरेश भट यांनी गझलेला मराठी भाषेच्या लयीत, तिच्या शब्दसंपदेत आणि सामाजिक जाणिवेत रुजवले. त्यांच्या गझलांमध्ये प्रेम, वेदना, सामाजिक वास्तव, माणसाची अस्वस्थता, जगण्याची धडपड आणि विद्रोही वृत्ती यांचे दर्शन घडते. त्यांनी गझल हा केवळ प्रेम व्यक्त करण्याचा प्रकार न ठेवता सामाजिक जाणिवेचे माध्यम बनवले. त्यांच्या लेखनामुळे महाराष्ट्रातील अनेक नवोदित कवींना गझल लिहिण्याची प्रेरणा मिळाली. गझललेखनाच्या तांत्रिक बाजूंकडे गांभीर्याने पाहण्याची परंपराही त्यांच्या गझलेच्या बाराखडीमुळे बळकट झाली.
मराठी गझलेतील सामाजिक भान :
मराठी गझलेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे सामाजिक भान. समाजातील विसंगती, अन्याय, विषमता आणि सामान्य माणसाचे दुःख गझलकार आपल्या शेरातून व्यक्त करतो. गझलकार कधी थेट प्रश्न विचारतो, कधी उपरोध करतो, तर कधी एखाद्या साध्या प्रतिमेतून मोठा सामाजिक आशय मांडतो. उदाहरणार्थ, ‘दिवा’ ही प्रतिमा केवळ प्रकाशाचे प्रतीक नसून आशा, संघर्ष आणि अंधाराविरुद्धची भूमिका दर्शवू शकते. ‘रस्ता’ हा जीवनप्रवासाचे प्रतीक होऊ शकतो आणि ‘सावली’ ही एकटेपणाची किंवा सोबतीची प्रतिमा होऊ शकते.
गझललेखनातील भाषा :
गझलेची भाषा अत्यंत महत्त्वाची आहे. शब्द कमी असतात, पण प्रत्येक शब्दाला अर्थाचे वजन असते. म्हणूनच गझलकाराने शब्दांची निवड काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. मराठी गझलेत तत्सम, तद्भव, बोलीभाषेतील आणि उर्दू-फारसी प्रभाव असलेले शब्दही आढळतात. मात्र भाषेचा वापर कृत्रिम वाटता कामा नये. सोप्या शब्दांत गहन भावना व्यक्त करणे ही उत्तम गझलकाराची ताकद आहे.
गझल आणि संगीत :
गझल आणि संगीत यांचे नाते अतिशय जवळचे आहे. गझलेतील लय, काफिया आणि रदीफ यांमुळे ती गेय बनते. त्यामुळे अनेक गझलांना तरन्नुम मध्ये सदर केले जाते. संगीतबद्ध केले जाते. गझल ऐकताना शब्दांचा अर्थ, आवाजातील चढ-उतार, लय आणि संगीत यांचा एकत्रित परिणाम रसिकाच्या मनावर होतो.
गझल लिहिताना काय आवश्यक आहे?
गझल लिहिण्यासाठी केवळ भावना पुरेशा नाहीत तर त्यांना शिस्तबद्ध काव्यरचनेत बांधण्याचे कौशल्यही आवश्यक आहे. त्यासाठी गझलकाराने वृत्त आणि मात्रांचा अभ्यास करावा. काफिया आणि रदीफ यांची योग्य निवड करावी. प्रत्येक शेराला स्वतंत्र अर्थ देण्याचा प्रयत्न करावा. अनावश्यक शब्द टाळावेत. नवीन प्रतिमा आणि रूपके वापरावीत. भाषेतील सहजता टिकवावी. आशयात नावीन्य आणावे. यमकासाठी अर्थाचा बळी देऊ नये. गझल मोठ्याने वाचून तिची लय तपासावी.
गझल आणि इतर कविता :
गझल आणि सामान्य कविता यांच्यात काही मूलभूत फरक आहेत. मुक्तछंद कवितेत छंदाचे बंधन नसते. भावकवितेत एक सलग आशय असतो. परंतु गझलेत काफिया-रदीफ-वृत्ताची बांधणी महत्त्वाची असते आणि प्रत्येक शेर स्वतंत्र अर्थ व्यक्त करू शकतो. म्हणूनच गझल लिहिणे म्हणजे फक्त दोन-दोन ओळींच्या कविता लिहिणे नव्हे. तिच्यामागे एक विशिष्ट काव्यशास्त्र आणि रचनाशिस्त आहे.
आजची मराठी गझल :
आजच्या काळात मराठी गझलेचे स्वरूप अधिक व्यापक झाले आहे. प्रेम आणि विरहाबरोबरच आधुनिक जीवनातील प्रश्न गझलेत येत आहेत. तंत्रज्ञान, बदलती नाती, शहरातील एकटेपणा, स्पर्धा, बेरोजगारी, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, पर्यावरण, स्त्रीजीवन, माणुसकी आणि अस्तित्वाचे प्रश्न अशा अनेक विषयांना आजची गझल स्पर्श करते. सोशल मीडिया, काव्यसंमेलने, गझल मैफली आणि विविध साहित्यिक व्यासपीठांमुळे गझलेचा प्रसारही वाढला आहे. अनेक नवोदित कवी गझललेखनाकडे आकर्षित होत आहेत.
गझल : मनाचा आरसा :
गझल ही मुळात माणसाच्या अंतर्मनाशी संवाद साधणारी कविता आहे. मनात दडलेल्या भावना शब्दरूपाने बाहेर आणण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. कधी ती मनाला हसवते, कधी डोळ्यांत पाणी आणते, कधी एखाद्या जुन्या आठवणीची दारे उघडते, तर कधी समाजातील वास्तवाकडे पाहण्याची नवी दृष्टी देते. गझलेचा एक शेर वाचून मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. एखाद्या दोन ओळींच्या शेरात आपलेच आयुष्य दिसते, आपलीच वेदना जाणवते, आपलीच एखादी आठवण जागी होते — यातच गझलेचे खरे सामर्थ्य दडले आहे.
थोडक्यात, गझल हा केवळ एक काव्यप्रकार नाही; ती भावना, विचार, लय, शब्द आणि जीवनदर्शन यांचा सुंदर संगम आहे. अरबी आणि फारसी परंपरेतून प्रवास करत उर्दू साहित्यात समृद्ध झालेली गझल मराठी भाषेतही रुजली आणि तिने आपले स्वतंत्र रूप धारण केले. मराठी गझलेला सुरेश भटांसारख्या कवींच्या योगदानामुळे नवी दिशा मिळाली. आज अनेक कवी गझलेच्या माध्यमातून प्रेम, विरह, माणुसकी, सामाजिक वास्तव आणि जीवनातील विविध अनुभव व्यक्त करीत आहेत. गझलेचे वैशिष्ट्य तिच्या लहान आकारात दडलेल्या मोठ्या अर्थामध्ये आहे. दोन ओळींचा शेर कधी संपूर्ण आयुष्याचे तत्त्वज्ञान सांगून जातो. गझल वाचताना आपण केवळ कविता वाचत नसतो; आपण आपल्या मनाशीच एक संवाद साधत असतो. म्हणूनच बदलत्या काळातही गझल जिवंत आहे, लोकप्रिय आहे आणि पुढेही रसिकांच्या मनावर राज्य करत राहील.
______________________________________________

No comments:
Post a Comment