दोन गझला : अविनाश काठवटे

 



१.


वंचना, विपदा, व्यथा जोपासता आल्या मला

खूपदा गप्पा स्वत:शी मारता आल्या मला


मी अगोदर प्रेम केले अन् कवी झालो पुढे,

खिन्नतेच्या पायऱ्या ओलांडता आल्या मला


सावलीने जीव इतका लावलेला आजवर

यामुळे गोष्टी उन्हाच्या सांगता आल्या मला


व्हर्च्युअल आलिंगनाचा फायदा झाला असा;

पापण्यांमध्ये नद्याही लपवता आल्या मला


तू दिले होतेस म्हणुनच दु:ख झाले भरजरी,

अन्यथा जखमा कुठे कुरवाळता आल्या मला


२ .


आपले कुठवर कथानक चंद्र-सूर्याचे असावे?

मी लिहू म्हणतोय आता; जे तुझे-माझे असावे


जर किनारा आडवा आला प्रथेचा आपल्याला,

शक्यतेचे पात्र खळखळत्या प्रवाहाचे असावे


आजही अव्यक्त आहे कोपरा दोन्ही मनांचा,

मात्र डोळ्यांचे अगोदर बोलणे झाले असावे


जर अबोल्याने कधी दोघांमधे शिरकाव केला,

एक कारण, 'एक होण्याचे पुन्हा' मागे असावे


तू विलक्षणता सुखाची; मी प्रभारी वेदनांचा,

यामुळे दोघांत बहुधा संतुलित नाते असावे

..................................................................


No comments: