१.
घडल्या घटनांमधून ज्यांना बोध घ्यायचा नाही
अशा माणसां उपदेशाचा डोस द्यायचा नाही
एकच प्याला पितो नि म्हणतो दारु वाईट आहे
कसे म्हणावे ठामपणाने पुन्हा प्यायचा नाही
पुढच्याला जर ठेच लागली सावध व्हावे मागे
ज्येष्ठांचा हा सल्ला ध्यानी कधी यायचा नाही
कष्टाविन सुख मिळवायाला हपापलेला आहे
गैरमार्गही करण्या मागे कधी ऱ्हायचा नाही
कर्ज काढुनी करतो सण अन् कर्जामध्ये बुडतो
हवी कशाला चैनी असली जो म्हणायचा नाही
गरजेपुरते गोड बोलुनी साधुन घेतो सारे
उपकाराच्या ओझ्याने पण लीन व्हायचा नाही
सल्ला देता मलाच म्हणतो कोण शहाणे तुम्ही?
सुंभ जळाला तरी तयाचा पीळ जायचा नाही
२.
देऊ सांगा पसा कुणाला?
दातृत्वाचा वसा कुणाला?
विवंचनेतच रात्रंदिन ते
म्हणू तरी मग हसा कुणाला?
पोटासाठी धडपड त्यांची
कसे म्हणावे बसा कुणाला?
इमान विकले निष्ठा ढळली
म्हणू नको का 'तसा' कुणाला?
निष्ठेचा बाजार मांडला
एकनिष्ठ मग ठसा कुणाला?
पूर्वज होते थोर तसा तो
मिळेल का वारसा कुणाला?
हृदयावरती घाव घालतो
मानू माझा कसा कुणाला?
३.
किती मी बघू रे तुझी वाट देवा
किती संकटांचा चढू घाट देवा
स्तुतीपाठकांची इथे खूप गर्दी
तसा मी कुणाचा बनू भाट देवा
मला ते म्हणाले दुजा ताट द्यावे
तरी मीच त्यांना दिला पाट देवा
दिली चंद्रमौळी मला झोपडी तू
तशी मोडकीही दिली खाट देवा
हवे ते मिळावे अशी एक इच्छा
कुठे सांग आहे असा हाट देवा
नको कोण दु:खी सुखी ठेव सारे
सुखाची अशी दाव ना वाट देवा
विनाकष्ट द्यावे अपेक्षाच नाही
नको फक्त केव्हा रिते ताट देवा
.......................................................

No comments:
Post a Comment