तीन गझला : राहूल नंदकिशोर कुलकर्णी

 




१.


शक्यता आकाश चुंबत राहिली

सत्यता पायास बिलगत राहिली


एकटा मी फक्त खंगत राहिलो

ती खुशाली रोज कळवत राहिली


धडधडाया आठवण पुरली पुढे

काळजाला तीच बरकत राहिली


मी तिला बाहेर फेकत राहिलो

तेवढी ती आत उतरत राहिली


ऐकणारे कान निजले शेवटी

एक आजी गोष्ट सांगत राहिली


अंत साजेसा जिला ना लाभला

ती कहाणी फक्त लांबत राहिली


काळजाची थांबली ना पानगळ

पाखरे मग आत हरवत राहिली


फक्त धूसर होत गेली सावली

काळजी अंधार निरखत राहिली


थांबला होताच मृत्यू लांबवर

जिंदगी तिकडेच सरकत राहिली


जन्मभर होकार ओठी राहिला 

जन्मभर डोळ्यांत हरकत राहिली


२.


पाहिली नाहीस तू अस्वस्थता  माझी

त्यामुळे कळणार नाही शांतता माझी


पायरीवरची नजर हटवून घे देवा 

माहिती आहे मलाही पात्रता माझी 


शक्यतेवरती विसंबून राहू द्या त्याला

तो बघू शकणार नाही सत्यता माझी 


आजही दोघांतला दोषीच ठरलो मी

आजही नडली मला मध्यस्थता माझी


मोडला माझा कणा गाफीलतेने तू

त्यातही दुर्लक्षिली नेमस्तता माझी


मी तुझा माझा कुणाचा हे ठरत नाही

केवढी माझ्यातही संदिग्धता माझी 


फारसे माझ्याकडे नाही दिखाव्याला 

फक्त ही सांगायला उध्वस्तता माझी 


संमतीवाचून मी जाऊ शकत नाही

ठेवली हाती तुझ्या तू मुक्तता माझी


पाहिले आहेस केवळ पात्र माझे तू

जाणली नाहीस अजूनी पात्रता माझी


३.


दोष व्यथेचा सांग तुझ्या या जीर्णपणाला देऊ?

अथवा माझ्या दुखावल्या विस्तीर्ण मनाला देऊ?


कधीतरी मी तुला आपला वाटत होतो नक्की

ही शंका, अंदाज, समज मी कुण्या क्षणाला देऊ


ओरबाडण्यासाठी त्यांची समान इच्छा असता

एकच काळिज, तेही हळवे कुणाकुणाला देऊ


गोष्टीमधले कासव आता बरेच थकले आहे

धीर एवढा खचलेल्या अन् खऱ्या सशाला देऊ


दोन नवे पर्याय ठेवले समोर आयुष्याच्या

सांग सुपारी दुष्काळाला अगर उन्हाला देऊ

....................................................................

No comments: