१.
आणतो जेव्हा घरी गजरा दिवस
मग विसरते रात्रही दुखरा दिवस
फक्त सांजेचेच राशन मागतो
मारतो आहे किती चकरा दिवस
आजचा चोरून होता आणला
मी कसा देऊ तुला दुसरा दिवस
लग्न करते पोरगी जाते पळुन
बाप करतो मग तिचा तिसरा दिवस
आसवांनाही अता येते रडू
एक उसना द्या कुणी हसरा दिवस
२.
पुन्हा लागतो चालु नकळत गावाकडचा रस्ता
सोबत येतो मातीमधल्या आठवणींचा बस्ता
गावामधल्या मातीमध्ये पिकते प्रेम अलौकिक
शहरामध्ये माणुस असतो चिंध्याहुनही सस्ता
कुणीतरी शिंपडा जराशी आपुलकी प्रेमाने
किती किती कोमेजुन गेला नात्यांचा गुलदस्ता
वास्तवातल्या काटेरी झुडपांची गर्दी भवती
कुठे हरवला माहित नाही स्वप्नांचा हमरस्ता
किती सोसल्या झळा उन्हाच्या तुला जगवण्यासाठी
एसीमध्ये बसून आठव कधी मायच्या खस्ता
३.
उरलेले चिंचोके मोजत बसतो
किती निसटले मोके मोजत बसतो
फक्त तिची सावलीच स्पर्शुन जाते
मी हृदयाचे ठोके मोजत बसतो
ठिगळांची तुरपाई उसवुन सगळ्या
आयुष्याची भोके मोजत बसतो
वीण कशी ही नात्यांची विस्कटली
मी तुटलेली टोके मोजत बसतो
अंगणातला एकाकी गुलमोहर
आठवणींचे झोके मोजत बसतो
संधी येते अन् निघूनही जाते
मी बोटांवर धोके मोजत बसतो
............................................................

No comments:
Post a Comment