आग्यामोहोळ : सम्यक विद्रोहाची मर्मग्राही गझल : डॉ. प्रभाकर शेळके


 



गझलकार आत्तम गेंदे परभणी जिल्ह्यातील पुयणी पालम ह्या गावचे. पानं उलटतात आयुष्याचे, आई आठवत राहते. तसेच एक पान आईसाठी अर्पण म्हणून येते. बालपणीच्या अलगद ओठी भाव मायेचे होते."हे आठवले ते आठवले, हे मी तुलाच सांगत होतो...तुझी आठवण येते आई' हे मी कुणास सांगू आता" हा मनाचा हळवा कप्पा कापूर होऊन जळत राहतो. आत्तम गेंदे यांची गझल ही अस्सल वेदनेची सल उजागर करते. तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची बांधिलकी घेऊन ही गझल तितक्याच सम्यक संबुद्धाच्या मध्यम मार्गाने माणुसकीच्या धम्म विचारांचे धारदार निर्धारक प्रबोधन करण्यासाठी आली आहे.यातील मतला शेर तितक्याच संवेदना सृजनतेने मुक्त होऊन येते.


'अशी लागली हृदयावरती गझलेची ही ओळ पुन्हा 

जागे झाले हृदयामध्यले आग्यामोहोळ पुन्हा...' (पृ.२३)


ही या गझलेची वेदनीची ठणक आहे. ही आत्तम गेंदेची गझल ओंजळभर नितळ निळाई घेऊन आलेली आहे. तथागत ज्या पिंपळ वृक्षाखाली बसले होते. या देहाला मनःशांती लाभली पाहिजे म्हणजे मोहापासून दूर जा माया प्रेम आपुलकी जिव्हाळा म्हणजे मनुष्य देहाची कांती आहे. तो शेर असा 

'ज्या झाडाच्या खाली दिसले बुद्ध तुला बसलेले.

तिथे आश्रित एक दिसणार आग्यामोहळ तुला' (पृ.५६)

समकालीन वास्तवाचे सम्यक दृष्टीने समर्पक समृद्ध सकारात्मक विचारधारेची पेरणी करणारी ही गझल आहे.

आग्यामोहोळ ही प्रतिमा अतिशय आशय संपन्न आहे. मद मोह तर आहेच पण जो विखारी दंश आहे तो मरणयातना देतो. ही गझल इथल्या अस्वस्थ समाज व्यवस्थेवर प्रंचड संयत मनोभूमिकेतून प्रहार करते. कारण 'मी सूर्यांचा वंशज आहे, म्हणून काजवा झालो नाही' फुले शाहू आंबेडकरी वैचारिक विचारांचे अधिष्ठान ही गझल देऊन जाते. इथल्या

जात व्यवस्थेवरचा माणूस म्हणूनच आपण माणुसकीचा झरा कायम राखला पाहिजे. इथे अजूनही जातिपातीचे राजकारण, दंगली,जातीवरचे छळ,भाषेवरचे बळ, आडनावावरून जात खोदून काढल्या जाते. जी जात नाही ती जातं शोधणारी माणसाची हलकट वृत्तीवर प्रचंड प्रहार करणारा हा शेर 

'माझे, तुझे,तिचेही माणूस नावं आहे.

जातीवरुन का मग इतका तनाव आहे?

जातीवरुन छळते, भाषेवरून छळते 


शहरातही तुझ्या या मागास गाव आहे' (पृ.२४) या गझलेची 

सम्यक दृष्टी दिली आहे.जितकी शिकली तितकी पुन्हा जातीयता वाढली आहे.एक शेर असा.

'आडनावांची कशाला बनविता यादी वगैरे...?


शोधल्या जातात मग आपापल्या जाती वगैरे' (पृ.२५) ही संयत विद्रोही अस्सल मनोभूमिका आहे.गुलामीलाच आझादी मानणारी ही व्यवस्था ही कोणतीच क्रांती करणार नाही.अंधश्रद्धा वरवरून मान्य नाही पण काही लुच्चे चेले

महापुरुषांच्या स्मारकांची शांती पूजा वगैरे करतील ही सखेद वेदनेची भंयकर उद्विग्नता ही गझल देऊन जाते. आजच्या शिकल्या आणि अज्ञानी स्त्रियांची सहनशीलतेची वेदनाही तितक्याच प्रखरपणे मांडली आहे. ती गुलाबी जन्म मागणार नाही. कारण तिला जन्मभर काट्याचा सहवास आहे. तिच्या मौनाचा आवाज हा हुंकार वेदनेचा आहे.तिच्या शालीनतेचे कौतुक होईल.पण पदर ढळता कामा नये.कारण निष्पाप डोळ्याचा इथे कुणी राहिला नाही. अशी सखेद वेदनेची ही गझल आहे. काळजाला जिभाळी लावून जाणारी, गोष्ट छोटीशी असली तरी जिव्हारी लागते. आजच्या बातम्यांवर तेवढा विश्वास राहिला पण इथे मिडियाच्या अफवा सन्नाट पसरली जाते.

या कोरड्या शेतात कुरुडू लावला की पऱ्हाट्या पेरल्या. इथल्या झोपडपट्टीला रात्रभर झोप नाही. बंगला दुपारी गाड झोपला आहे. जातीमुळे देशभक्तीची शंका घेणारी इथली बांडगूळी व्यवस्था म्हणून ही व्यवस्था आमच्या गुणवत्तेवरही शंका घेते जसे.

'सिद्ध नाही व्हायची ईमानदारी आमची

पात्रता फेरीत सुद्धा लाच द्यावी लागते...!

घेतली जातेय शंका आमच्या जातीमुळे 

देशभक्ती सिद्ध करुनी दाखवावी लागते' (पृ.२७) अशी ही प्रंचड संयत विद्रोही मनोभूमिकेतून शब्दांची अस्सल सल व्यक्त करीत ही गझल मोठा आशय घेऊन आली आहे.आजचे समाजकारण राजकारण फक्त निवडणुकीपुरते विकास, फक्त नावपुरता. या गझलेने समकाल अतिशय विदारकतेने चित्रित केला आहे. मूळनिवासी भारतीयांना प्रजासत्ताक संविधानाचे मूल्य दिले. युगांची गुलामगिरी ही लाचरी होती यातून मुक्तता मिळाली. तथागत बुद्धांची पिंपळ सावली मिळाली.तुला साहेब होण्याचा हक्क मिळाला. चवदार तळ्याचा संदर्भ अतिशय अप्रतिम. या तहानेने बारव बाटले कधीकाळी. म्हणून ही गझल निर्धाराचे सत्य शब्दशस्त्र उगारून जाते ते असे.


'तुला या संविधानाने दिला अधिकार चालण्याचा 

तुझ्या पायात जुलमी साखळी होती कधीकाळी' (पृ.३०)

माणुसकीचा गहिवर घेऊन मानवी मूल्यांची जोपासना करणारी ही गझल आहे. कवी गझलकार आत्तम गेंदे हे

विनय विवेकी विचारधारेचे पाईक आहेत. वाचन चिंतन मनन हा अनुबंध असल्याने ते म्हणतात -

'मी सूर्याचा वंशज आहे, म्हणून काजवा झालो नाही

स्वतंत्र आहे माझा साचा, क्लोन कुणाचा झालो नाही'

(पृ.३२)हे धारदार निर्धाराची ध्येयासक्ती घेऊन येणारी ही गझल मनाचा तळ ढवळून काढते. तो असा 'जात बदलता येईना.. मी आडनाव बदलू का?' (पृ.३४)हे सत्य नाकारता येत नाही. आज सावित्रीमाईच्या लेकी म्हणून वावरताना अजून तिच्यावराचा अन्याय अत्याचार थांबला नाही. आजचे समकालीन सम्यक सत्य असेच आहे. त्याची जात पाहिली जाते. त्याने दिल्ली तख्त गाजविले.एक शेर

असा 

'बातमी समजते आम्हांला पराक्रमाची नंतर 

परंतु त्याही आधी त्याची जात कळवली जाते 

एखादे अक्षर गिरवावे तशी गिरवली जाते..

जन्मापासून आपापली जात शिकवली जाते!' (पृ.५२)एक अदिम सत्य या गझलेने दिले ते म्हणजे जखम भरण्यासाठी हळद लावल्या जाते. तशी लग्नाआधी हळद लावल्या जाते.कारण दोन जीवांच्या आयुष्यभराच्या जखमा भरून निघाल्या पाहिजे. हा चिंतन आशय मनस्वी आहे. धर्मनिरपेक्षतेचा कितीही धूर केला पण हे जातीयवादी आग्यामोहोळ धर्माच्या फांदीला बसले तर डसल्याशिवाय राहत नाही. म्हणून तथागतांच्या सम्यक संबुद्धाच्या वृक्षाखाली तू विचारांचा साधक हो! हे सत्यता ही गझल देऊन जाते. डॉ.बाबासाहेबांनी सर्वहरा समाजाच्या उन्नतीसाठी संविधान दिले म्हणून काळोख दूर झाला. तो शेर असा,

'स्वतः उजळून भीमाने मिटवली रात्र कायमची.

मिळाला सूर्य दुनियेला जो कधी मावळला नाही' (पृ.७०)

आंबेडकरी गझलांचा आत्तम श्वास आहे. त्यांचे अक्षर जगणे कारणी लागले. या गझलेची निस्सीम निळाईची शक्ती आहे ती अशी बा भीमा सारखा बाप,भीम शिकला कसा? दूर चंद्रासारखा फळा होता. या कर्मकांडातून धम्माने वाचवले ते खरे ज्ञान दृष्टीचे औषध. खरे वाघीणीचे दूध दिले रे बाबा, पण आजचे ताट चाटणारे मांजर. काल मुजरे करीत होते. पण आज सायबासारखा वाग, म्हणून ही गझल वाचा 

'का तुला वाटते लाज जयभीमची,

भीम दिसतो मला भास्करासारखा.

विषमतेचा इथे रोग होता जुना 

वैद्य मज भेटला गौतमासारखा' (पृ.७१) माणूस म्हणून एक घरटं असतं ती आई माई बाई असते ती सृजनशील स्नेहाळू भावनेची आई या गझलेत आहे. आईत विठ्ठल दिसणे हा एक अमोघ अलौकिक भावबंध आहे. तर लेकरू होऊनही गझल अशी 

'तुझ्या निर्वाण दुःखाचे इथे होणार बघ आत्तम.

अता बुद्धास भेटाया तुझ्याही चालल्या जखमा' (पृ.८३)

पक्ष बदलणे सहज सोपे आहे तसे जात बदलणे सोपे व्हावे आता. आजच्या समकालीन वास्तवाचे सम्यक भान ही गझल देऊन जाते.आपल्या मनोगत ऋणाईत ते लिहितात 

'महाकवी श्रद्धेय वामनदादा कर्डक यांची गाणी लहानपणापासून ऐकत होतो. पण नंतर गझलेच्या दृष्टीने ती ऐकू लागलो आणि त्यातूनही लय, यती, आशय याबाबतीत खूप काही शिकलो.भीमराव पांचाळे ते डॉ राज रणधीर यांच्यापर्यंत ऋणाई व्यक्त केली आहे. तर आत्माराम जाधव (आत्मा) शब्दस्नेही म्हणून लिहितात -

प्रेम आणि करुणासोबत घेऊन चालणारी समतेच्या मार्गावरील शब्दांची आग्यामोहोळ सामाजिक प्रश्नांवर मारलेला घनाघाती घाव, कौंटुबिक नात्यांमधील नाजूक भावनिकता आणि प्रेमातील अबोल समजूतदारपणा, अल्लड अवखळ प्रांजळपण,..या सर्व छटा त्यांच्या गझलातून अतिशय परिपक्वतेने उतरल्या आहेत.

सामाजिक समस्यांवर घाव घालणारी त्याची गझल अतिशय सभ्य, सौम्य भाषेत व्यक्त होत जाते. त्याच्या प्रत्येक शेरात त्याच्या जगण्याचा अनुभव आणि अभ्यासूवृत्ती स्पष्ट जाणवते (पृ.१५आत्मा) तर नितीन देशमुख शुभेच्छा देताना "आत्तम गेंदे यांची गजल या विवक्षित भावभावनांची अस्वस्थ करणारी गुंफण आहे.ती जेवढी हळवी तरलं आहे, तेवढी ती मानवतेचा हट्ट धरणारी आहे.जातिअंताची मागणी करणारी आहे.. तर उर्मिला बांदिवडेकर (दिवाणकार) "तुम्ही तुमच्या संग्रहाचे नाव 'आग्यामोहोळ' ठेवलेत. हे नावच तुमच्या सृजनाची ओळख आहे. तुमच्या शेरात जे आहे तेच या नावात आहे. 'जागे झाले हृदयामधले आग्यामोहोळ पुन्हा' हा शेर म्हणजे या संग्रहाचा आत्मा आहे. गझल एकदा डसली की, ती आयुष्यभर सोडत नाही त्या डसण्यात गोड वेदना आहे (पृ.१०) ख्यातनाम शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांची पाठराखण अतिशय शब्दसावली होऊन आली आहे. ती अशी आंबेडकरी गझलेतील आस्वासक स्वर असे संबोधले आहे. "आत्तम गेंदे यांच्या गझलांमध्ये केवळ प्रेम नाही. 

त्यांची गझल समाजातील विसंगतीवर,गरिबीवर व 

सर्वसामान्यांच्या संघर्षावर थेट भाष्य करते. आजूबाजूच्या वास्तवाचे चटके त्यांच्या शेरामध्ये प्रकर्षाने जाणवतात.

उपरोधिक आणि टोकदार शैलीत सामाजिक व्यवस्थेवर बोट ठेवणे हे त्यांच्या गझलेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अस्वस्थ वेदनेचे मनमस्तिष्कांत एक पिंपळ पान हे ख्यातनाम चित्रकार संतोष धोंगडे याचे सूचक मुखपृष्ठ आशय संपन्न आहे.

आत्तम गेंदे यांना मनापासून शुभेच्छा! 

_______________________________________'__'___

● आग्यामोहोळ

● आत्तम गेंदे

● स्वयं प्रकाशन, सासवड, पुणे. 

● किंमत २०० रूपये 

....................................................................................


No comments: