१.
अश्रूंवरून कुठला अंदाज येत नाही
प्रत्येक भावनेचा आवाज येत नाही
मज एकदा मनाने अद्भुत सवाल केला
अपुल्या खरेपणाचे का व्याज येत नाही?
नाही परावलंबी तो तो सुखात आहे
मदतीस हात कुठला निर्व्याज येत नाही
मी फार संयमाने पैशास हाक देतो
ते रोज हेच म्हणती मी आज येत नाही
ज्यांच्यामुळे सणांना अंगण जिवंत वाटे
हल्ली अशा मुलांची का गाज येत नाही?
२.
बोलणे श्रुंगार केले पुस्तकांनी
केवढे उपकार केले पुस्तकांनी
मी दगड होऊन त्यांना भेटलेलो
त्यास नक्षीदार केले पुस्तकांनी
कल्पना विक्षिप्त वागू लागलेल्या
योग्यसे उपचार केले पुस्तकांनी
रात्रभर जागून अक्कल पाजली अन्
चांगले संस्कार केले पुस्तकांनी
घोळक्यामध्ये निराळा वाटतो मी
मौन बाणेदार केले पुस्तकांनी
लागली गोडी जसजशी वाचनाची
झोपणे तडिपार केले पुस्तकांनी
३.
सोसून क्षीणलेले जगणे तजेल झाले
माझ्या कथानकाला अश्रू तुझे मिळाले
घेऊन हात हाती दोघे तयार होतो
तितक्यात निश्चयाचे खांदे कसे गळाले
सोसून क्षीणलेले जगणे तजेल झाले
माझ्या कथानकाला अश्रू तुझे मिळाले
घेउन हात हाती दोघे तयार होतो
तितक्यात निश्चयाचे खांदे कसे गळाले
चुक पोषणात आहे की घातपात आहे
भलतेच पेरले अन् भलतेच पीक आले
अपुलेच चित्त जेव्हा खोदून पाहिले मी
तिथले रहस्यमय जग तेव्हा कुठे कळाले
अंती मढ्यास केवळ आदर, कदर मिळाली
जगणे रटाळ जगला मरणे सुरस निघाले
नियतीवरी फुकाचा आरोप होत होता
माझ्या पराभवावर माझे ठसे मिळाले
वेशीस प्रश्न पडला गावात काय झाले?
सारे तरूण पक्षी शहरात का पळाले
.............................................................

No comments:
Post a Comment