१.
आई उन्हात होती बाबा उन्हात होते
अन् याच कारणाने सारे सुखात होते
प्रत्येक माणसाला घर सोडल्यास कळते
सारेच सुख खरे तर अपुल्या घरात होते
घ्यावा उगाच संशय का दुश्मनावरी मी
ज्यांनी शिकार केली ते काळजात होते
आले कसे म्हणू मी, गावात हिंस्र प्राणी
माझेच गाव वसले जर जंगलात होते
मी स्टँडवर तयांना सोडायला निघालो
जे एकट्यास मजला सोडून जात होते
२.
इच्छा अन् मर्यादा यांत समन्वय साधत होती
एक पोरगी बुरख्यामध्ये सेल्फी काढत होती
शतकांपासुन पुरुष स्त्रियांना अबला बोलत आला
अन् स्त्रीच सर्व पुरुषांना जन्माला घालत होती
दुःख तिचे मोठे होते आणिक लहान होते घर
पर्याय म्हणुन बाई तेंव्हा कांदा कापत होती
माझ्या आयुष्याचा जेंव्हा बॅण्ड वाजला होता
त्या एका पोरीच्या दारी सनई वाजत होती
छडी मास्तरांची हातावर माझ्या लागत होती
वर्गात एक पोर स्वतःचे डोळे झाकत होती
पिंजर्यातला पोपट लव यू लव यू बोलत असतो
खूप जणांची प्रेमकहाणी अशीच चालत होती
मला कोणत्या देखाव्याचे कौतुक नव्हते, कारण
जन्नत माझ्या आईच्या पायाशी लागत होती
३.
अपुल्या मनाची आसही वेलीप्रमाणे वाढते
आधार मिळतो जेवढा, ती तेवढी फोफावते
गेलो असा पकडायला की दूर संधी धावते
नाही मला मिळणार तर ती दार का ठोठावते
एका तिरावर घर तुझे, दुसर्या तिरावर घर तिचे
अन् जात नावाची नदी दोघांत तुमच्या वाहते
भाषेस नसतो रंग ती वसते अशी सार्यांत की
ती ठेवते रोजा कधी, श्रावण कधी ती पाळते
बघता तिचे नाकारणे, पडतो पुन्हा प्रेमात मी
नाकारते जर ती मला, तर का अशी नाकारते
.....................................................................

No comments:
Post a Comment