१.
तिचा मुद्दा जवळच्यांनी उगाचच काढला होता
मला तेव्हा किती जोरात ठसका लागला होता
उभय देहांत भोगांचा निखारा पेटला होता
बळी मग संयमाचा वासनेने घेतला होता
मनाच्या फ्लॅटवर जेव्हा तिने अंकित मला केले
तिच्या हृदयात प्रेमाचा निवारा बांधला होता
निसटता स्पर्श दोघांना जसे आणत जवळ होता
तसा ताबा मनावरचा सुटत मग चालला होता
कधी काटा गुलाबाचा तिला टोचू दिला नव्हता
तिच्या हृदयामधे मी सोनचाफा लावला होता
अवास्तव मागणी कुठली अशी केली कधी नव्हती
दडवल्या भावनांचा ओघ आता संपला होता
मला स्वप्नात दिसते नेहमी ती फक्त ओलेती
कशाने जीव माझा एवढा वेडावला होता
मला बघताच होते पाठमोरी का अचानक ती?
तिच्या डोळ्यांत माझा पावसाळा साठला होता
नदी डोळ्यांतली सुकली जरी ती भासवत असते
किनारा पापण्यांचा नेमका ओलावला होता
२.
बोलतो तोंडातल्या तोंडात आहे
ठेवले कोणी तुला धाकात आहे
तरळले डोळ्यांत अश्रू पाडसाच्या
वाघ हरिणी मारतो साक्षात आहे
काळजावर कोरला सुविचार गेला
'ईश्वराचा अंश प्रत्येकात आहे'
विश्व मी शून्यातुनी निर्माण केले
पाहतो जो तो मला पाण्यात आहे
काढली मी चूल भिंतीवर हुबेहुब
भाजलेली भाकरी चित्रात आहे
लागली उचकी मला इतकी अचानक
नेमका आलो तिच्या गावात आहे
संपले भोगून सगळे भोग आता
दैव माझे फार आनंदात आहे
३.
हातातली पिके तर वाहत पुरात गेली
शेती गहाण तेव्हा त्यांच्या घशात गेली
वागायचे कसे हे कळले कुणास नव्हते
समजून घेत त्यांना सारी हयात गेली
संकोच निर्णयाच्या दारात थांबलेला
स्वप्ने म्हणून माझी पुरली घरात गेली
अंधार कोठडीशी मैत्री जुनी तशी तर
मागायला कवडसे भीती उन्हात गेली
'गुंजारवामुळे त्या बदनाम फूल झाले'
ही बातमी घरोघर एका क्षणात गेली
खिडकीमधून कायम न्याहाळते मला ती
इच्छा म्हणून रुंजी घालत मनात गेली
ना वागलो कुणाशी होऊन मी पुणेकर
पण कारकीर्द सगळी होती पुण्यात गेली
..............................................................

1 comment:
सुंदर गझल सरजी
Post a Comment