१.
स्मरतो तुला रिकामा, हाती धरून प्याला.
रडणे महाग पडते, जातो भरून प्याला!
मदमस्त आसवांची चाखा जरा खुमारी.
घ्या ना जरा सुखांनो, अश्रू भरून प्याला
शुद्धीत राहण्याचा सारा अहम गळाला
तो बोललाच ऐसे, हाती धरून प्याला
स्वप्नात देव मजला छोटा रिचार्ज मागे
देवास पाजला मी, उष्टा करून प्याला
गंगा पवित्र झाली ऐकून शब्द सुंदर
’मी माळ घातली रे’ म्हणतो हसून प्याला
किंकाळते तृषा ही अतृप्त जन्म गेला
मद्यास आग लागो... जावो जळून प्याला!
माझाच हाय मजशी संवाद होत नाही.
मध्यस्थ ठेवला मी, हल्ली म्हणून प्याला
टाहो कफल्लकांचा गगनात लुप्त झाला
अन् सांडला धरेवर स्वर्गामधून प्याला!
२.
तुझ्या आसवांनी भिजव पावसाला.
तुझे नेत्र दाखव रडव पावसाला!
तुझ्या रिक्त प्याल्यात पिळतोय डोळे...
अधाशाप्रमाणे रिचव पावसाला !
बघू अश्रु धो धो कि पाऊस धो धो...
उचल नेत्रगंगा भिडव पावसाला!
तिचा एक अश्रू महायुद्ध तिसरे
तिच्या लोचनांच्या विझव पावसाला
दुरूनी चिडवण्यात असते नजाकत
सिगारेट दाखव झुरव पावसाला
३.
सुखाने हाय जगण्याला किती छळले व्यथाराणी.
तुला टाळू नये कोणी, मला कळले व्यथाराणी.
फुले व्हावीत अश्रूंची असे तेव्हा ऋतू होते...
तिच्या स्मरणात रडण्याचे, दिवस ढळले व्यथाराणी.
कुणी समजावुनी सांगा अता या सांत्वनालाही.
युगाचे कोरडे अश्रू कुठे गळले व्यथाराणी?
महालातून रस्त्यावर सखी आली जराशी तर...
फुलांचे पाय मातीने म्हणे मळले व्यथाराणी.
प्रतीक्षा फोडते डोळे, छळे अंधार जन्माचा...
पुन्हा दारात अश्रूंचे दिवे जळले व्यथाराणी!
.................................................................
No comments:
Post a Comment