१.
तलम मखमली पत्र गुलाबी आज जाळुनी आले मी
तुझी नि माझी प्रेमकहाणी पार विसरुनी आले मी
शेवटची ती भेट चोरटी गुपित दडवुनी आले मी
नि:शब्दपणे निरोप घेता ओठ मुडपुनी आले मी
जशी अचानक वीज पडावी स्वप्ने सारी दुभंगली
दाह मनाचा नदी किनारी शांत शमवुनी आले मी
या वळणावर तोल स्वतःचा सावरला मग आज पुन्हा
निसरड्या क्षणी भान राखले मोह टाळुनी आले मी
कृष्णवर्ण नभ साक्षीने जी शपथ घेतली दोघांनी
जन्मोजन्मी तुझीच राधा वचन तोडुनी आले मी
२.
माहेर सोडताना समजून घेतले मी
डोळ्यांत आसवांना अडवून ठेवले मी
काळीज सार केले सुनसान मांडवाशी
बापास मान माझी वळवून बघितले मी
जडपावली निघाले, वाटेत मग स्वतःला
नवख्या रुपात पुरते हरवून टाकले मी
माहेर पारखे गं झाले क्षणात आता
कुंडीत रोप दुसऱ्या रुजवून टोचले मी
कुंकूम पावलांनी केला प्रवेश दारी
लक्ष्मी बनून घर मग उजळून ठेवले मी
........................................................

No comments:
Post a Comment