तीन गझला : विद्यानंद विश्वेश्वर हाडके

 



१.

आयुष्याच्या वाटेवरती वळता वळता वळले सारे

कोण आपले कोण पराये कळता कळता कळले सारे


बांध बांधले फुटून गेले शिस्त शेवटी तुटून गेली

किती थोपवू आसवास मी गळता गळता गळले सारे


आनंदाचे क्षण सोनेरी बघता बघता पसार झाले

अन् दु:खाने जीवन माझे दळता दळता दळले सारे


परदास्याच्या बेड्या तुटल्या एक तुझ्या बस विश्वासाने

युगायुगाचे जळमट तेव्हा जळता जळता जळले सारे


ज्या गोष्टींचे घडणे अगदी पूर्वीपासून ठरले होते

तसे आजही ठरलेले मग टळता टळता टळले सारे


राष्ट्रध्वजाला जेव्हा जेव्हा भ्रष्टाचारी हात लागले

मानवतेचे विश्वरंगही मळता मळता मळले सारे


सौंदर्याचा हुकुमी एक्का ज्याला त्याला भारी पडतो

विश्वामित्रा तूच काय रे चळता चळता चळले सारे


२.


पिकले कधी न माझ्या शेतात चार दाणे

गाऊ कुण्या मुखाने शेतीप्रधान गाणे


त्यांची भविष्यवाणी खोटी करू श्रमाने

शेतात जान नाही म्हणतात जे शहाणे


माझीच भाग्यरेषा बदलून टाकतो मी

विश्वास मज दिला हा माझ्याच मनगटाने


इतकीच रास्त इच्छा मालास भाव यावा

व्हावे कधीतरी मग अमुच्या मनाप्रमाणे


त्यांना दिवस सुगीचे ज्यांची दुकानदारी

अन् आमुच्या नशीबी कर्जामधे रहाणे


शेतीप्रधान देशा तुजला भविष्य नाही

जो तो पसंत करतो शहराकडेच जाणे


३.


रूढी परंपरेचा का बांधलास शेला

या मानवी जगाच्या टाळून सभ्यतेला


काबा नको न काशी बस हाक द्या स्वत:ला

अन् जागवा जरासे अपुल्याच अस्मितेला


या सभ्य संस्कृतीला साधा सवाल माझा

वस्तीत माणसांच्या माणूस का भुकेला


सूर्यास जाग यावी गावाकुसात अमुच्या

येथे युगायुगाचा अंधार दाटलेला


ज्यांना हवाच होता काळोख भोवताली

देतील दोष ते मग या तांबड्या दिशेला


मी मिळविले कितीदा हातात हात ज्याच्या

सोडून हात माझा तोही निघून गेला


बोलू कसा कुणाशी? मज प्रश्न ग्रासतो हा

एकेक शब्द माझा कंठात दाटलेला


दिसती कसे मला हे सारेच शांत येथे

माणूस शोधतो मी आतून पेटलेला

..............................................................

No comments: