दोन गझला : डॉ.मनोज ज्ञानदेव सोनोने





१.


आत्म्यात राहणारा तू श्वास पांडुरंगा

विसरू कसा तुझा मी आभास पांडुरंगा?


मूर्ती तुझीच आहे देहात सावळी ही

भोगेन मी सुखाने वनवास पांडुरंगा



आली अनेक वळणे ती ध्येय भुलवणारी;

हृदयात तूच होता विश्वास पांडुरंगा.


व्हावी कृपा म्हणोनी या भाबड्या जिवावर

ही टाकली फुले बघ दारास पांडुरंगा


माझ्या तुझ्यात नाही कुठलाच भेद तर मग

देतोस जीवघेणा का भास पांडुरंगा?


धोका दिला जगाने जेव्हा क्षणा क्षणाला

तू दाविलास रस्ता हृदयास पांडुरंगा



२.


निश्चय तुझ्या मनाचा कायम

श्वास माझ्या उराचा कायम


क्षणभर राग धरू, दूर करू

निर्धार स्वराज्याचा कायम


भुतकाळाची नको काळजी

हात धर भविष्याचा कायम


गोल गोल फिरवते जगाला

तुझी अनमोल वाचा कायम


धडधडतो जीव तुझा अजुनी

ओलावा प्रेमाचा कायम


तुझ्या हातात कारभार घे

छत्रपती नामाचा कायम


सात जन्म सोबत दे म्हटली

विठ्ठल युगायुगाचा कायम

...................................................


No comments: