१.
सांगू कसे कुणाला झाल्यात वेदना
बोलून का कमी त्या होतात वेदना
ती सातजन्मवाली सोडून गोष्ट दे
एकाच या मिळाली जन्मात वेदना
तो तीक्ष्ण शब्दमारा कानावरी सदा
अंतर्मनात आता गेल्यात वेदना
थैमान पावसाने मनसोक्त घातले
आली रुजून साऱ्या शेतात वेदना
सोडून साथ जाती स्वार्थात माणसे
हातात हात तेंव्हा देतात वेदना
२.
प्रयत्न करुनी कला निपुणता मिळवत गेले
परिस्थितीवर मात करत मज घडवत गेले
रूप रापले संघर्षातच संसाराच्या
कष्टांचे मग घट्टे हाती मिरवत गेले
किती तडाखे लाटांचे मी झेलू सांगा
वळणावाटे सारे पाणी वळवत गेले
आघातांनी आयुष्याचे गीत बिघडले
एकेकाने सप्तसुरांना जुळवत गेले
विणली नाती सुखी टिकविणे अवघड होते
जीव सिंचुनी स्नेहफुलांना फुलवत गेले
थोर थोर जे सांगत होते मनी बिंबले
शक्य तेवढे जीवनपटली गिरवत गेले
ठेच लागली, रक्त निघाले, अनुभव आले
पीढीसाठी समोरच्या ते जमवत गेले
३.
रोगावरती किती पद्धती उपचाराच्या
शब्दांची पण इथे वाणवा आधाराच्या
भाग्य कुणाचे घडणे घटणे काळाहाती
गगनाला मग भिडल्या किमती भंगाराच्या
पाणी जीवन करू जतन हे शिकत राहिलो
वाहत गेल्या पुरात चिंध्या संसाराच्या
हुजरेगिरी नि भाटगिरीची गरज कशाला
मानाने जर चालू वाटा संस्काराच्या
शेत बहरता बळीस संकट अतिवृष्टीचे
सावकार ओझ्यात बुडवतो उपकाराच्या
..............................................................

No comments:
Post a Comment