तीन गझला : प्रभाकर पवार





१.


जिवाला जगाया किती कष्ट येथे

तरी लाभ नाही कधी इष्ट येथे


मला प्राक्तनाचा जरा लाभ नाही

बहुत स्वप्न माझी जगी नष्ट येथे


कुणी आयुष्याला असे काय दिले

पुरावा दिसेना मला स्पष्ट येथे


भुकेशी सदोदित तिचा वाद होता

मिटे वाद जेव्हा दिसे उष्ट येथे


कथा वाचलेली सरळ धोट होती

तिचे फक्त मुखपृष्ठ उत्कृष्ट येथे


२.


वारीचे मज खूळ विठ्ठला

जगण्याचे या मूळ विठ्ठला


वारकरी मी निष्काम तुझा

तू भक्तीचे कूळ विठ्ठला


गोपीचंदन भाळी बुक्का

दे पायाची धूळ विठ्ठला


हवा सुखाचा अंतिम थांबा

सलग असू दे रूळ विठ्ठला


जीर्ण जाहलो अती जीवनी

संसार किती सूळ विठ्ठला


३.


माझी नितांत सुंदर अन् गोड रात असते

स्वप्नात रोज माझ्या ती येत जात असते


रागावते कधी अन् धरते कधी अबोला

त्यातील गोडव्याची न्यारीच बात असते?


मी पेटता तिच्याने उजळून रात निघते

माझ्या दिव्यातली ती अलवार वात असते


स्वप्नात भेटण्याला आता विराम देऊ

का गे तुझा नकोसा तू सूर गात असते


ती भेटण्यास दिवसा देते नकार हल्ली

चर्चा नकोच म्हणते जग हे पहात असते

........................................................


No comments: