१.
नेमके जे न्यायचे, विसरून गेली
विश्वशांती माणसे ठेवून गेली
हे किती बुजगावणे तू छान केले
पाखरे अंगावरी खेळून गेली
ती मजा प्रत्यक्षही येणार नाही
काल जी स्वप्नामधे येऊन गेली
या तनांना जाण नसते यातनांची
ही मने कुठल्या कुठे पेटून गेली
ही किती सजली फुलांनी अंत्ययात्रा
डोळियांचे पारणे फेडून गेली
२.
संकल्पना जिण्याची मागास होत गेली
नुसतीच माणसांची पैदास होत गेली
नाही म्हणू नका रे कुठल्याच याचकांना
त्यांच्यामुळेच दारी आरास होत गेली
निष्काम हिंङणाऱ्या साधूस पाहिल्यावर
माझी विलास वृत्ती वनवास होत गेली
तोडून बंध सारे भुलला मऊपणाला
ती गाठ रेशमाची गळफास होत गेली
नाही दिली परीक्षा त्यांनी कधी विषाची
अख्खी पिढीच त्यांची नापास होत गेली
..........................................................
1 comment:
सुंदर
Post a Comment