१.
मनाविरुद्ध यायचे, मनाविरुद्ध जायचे
अयोग्य वृंद-गाण हे, मनाविरुद्ध गायचे
घरात सर्व कोपरे दिसे, पुरे सुने-सुने
बिळात हात घालुनी, मनाविरुद्ध घ्यायचे
ठरीव बोलचालि अन्, ठरीव वागणे इथे
भरीव शब्द दुर्जना, मनाविरुद्ध द्यायचे
वदावयास सारखी लिपी-मुखे उताविळी!
अळी-मिळी नि गुपचिळी, मनाविरुद्ध ऱ्हायचे
शिजावयास घातले, पदार्थ हे उणे-दुणे
कसे-बसे घसे धरून, मनाविरुद्ध खायचे
असेच हे कसे तरी, इथे सुरू, तिथे सुरू
कुपात-कोंदल्या जली, मनाविरुद्ध न्हायचे
२.
चांदण्यांनी वळूनी पहावा असा
यार माझा, मनाशी जपावा असा
कोणत्या वेदना, दाखवू मी जगा?
पाखरांनी प्रमाणित करावा असा
कोण आहे, नितीचा खरा चेहरा?
आरशाने, बघूनी झुलावा असा
कोणत्या मौसमाला म्हणावे बरे?
अंतरीचा उमाळा, भुलावा असा
काल, चाके रथाची जमीनीत ती
आज चाकांविना तो धसावा असा
फार काही नको, मज अता जीवना
फक्त दे ... अत्तराने भिनावा असा -
३.
शुभ्र ताऱ्यांमधे पाहतो मी तुला
आणि प्राणाहुनी चाहतो मी तुला
या मनाला फुटे, नित्य अंकूर जे
रोजच्या रोज ते, वाहतो मी तुला
दूर, गंधर्व- स्वर्गी, नसे-थाप ती
दुःखितांच्या मनी, बाहतो मी तुला
सत्य अन् मानवी, कर्म जेथे असे
त्या ठिकाणीच अवगाहतो मी तुला
ही हवा, ह्या नद्या, आणि कोठे बघू?
शुद्ध श्वासांमधे, नाहतो मी तुला
रोज मी या जगाला खरे सांगतो
मीच ईश्वर, मनी पाहतो मी तुला
........................................................

No comments:
Post a Comment