दोन गझला : शंकर विटणकर





१.


सखे वाटतो ना तुझ्यासारखा मी 

कितीदा पुन्हा पाहतो आरसा मी


कधी वाटतो टेकलेला नभाला 

कधी क्षूद्र वाळूकणाएवढा मी


कशाला गरीबास हिणवी अमीरा 

कधी राजबिंडा कधी नागडा मी 


जवळ जाउनी पाहिले ज्ञानि-पंडित 

अनूभव म्हणाला बरा फाकडा मी 


तुझा दंभ पाहून लंकाधिशासम 

बरा वाटतो मज लुळा-पांगळा मी 


कसे ओळखू आपल्याला कळेना 

कुणी दुष्ट म्हणती कुणी चांगला मी 


कसा गर्व हा रूप-ज्ञानीपणाचा 

तुझा पुत्र होतो कधी माकडा मी 


करुन बंद डोळेहि सत्यास बघतो 

नसे काळजाने पहा आंधळा मी


मला देव तर भेटतो बालकांतहि 

सदा रंगतो त्यासवे छानसा मी 


जवळ ये सखे रात्र बहरून आली 

तुझ्या चांदणीचा पहा चांदवा मी  


२.


डोळ्यांत आग होती पाणी कुठून आले 

काट्यांघरी फुलांचे साथी कुठून आले 


दुःखेच पेरलेली शिंपीत काळजाच्या 

करुणारुपात त्यांचे मोती कुठून आले 


सामान्य सर्व लढले देशास मुक्त करण्या

हे संसदेत राजा-राणी कुठून आले 


त्या ताजहून सुंदर सखये गुलाब माझा

प्रेमात गरिब किंवा शाही कुठून आले 


हृदयातुनी फुलवतो सृष्टीस तो विधाता 

विकृत तिला कराया ज्ञानी कुठून आले 


केलीस प्रीत सखये विसरून जाति-पाती

संसार थाटण्या मग नाही कुठून आले

............................................................


No comments: