१.
दिवस दिवसभर जागेवर रेंगाळत बसतो
कर्म न करता वाट फळाची पाहत बसतो
नव्या दमाच्या गझला लिहीन म्हणतो नुसता
जुन्याच साऱ्या संदर्भांना चाळत बसतो
शिस्त एरवी पाळत नाही ट्रॅफिकची पण
कालबाह्य झाल्या नियमांना पाळत बसतो
सांगत असतो इथेच सोडुन सर्व जायचे
आणिक जमिनी दुसऱ्यांच्या बळकावत बसतो
प्रेमाचे जे नाते होते हरवुन गेले
उरलेल्या तो प्रेमखुणा सांभाळत बसतो
२.
कृतघ्न आहे माहित असुनी हसत झेलते वार तुझे
मैत्रीमध्ये गुणही सारे दोषांसह स्वीकार तुझे
प्रेमाच्या कुठल्या नात्याचे कधीच ओझे नसते ना?
दगड मनावर ठेवुन मी का उचलत जाते भार तुझे?
लोकहिताचे निर्णय घेण्या कुणी रोखले सांग तुला
स्वतःच घे तू जबाबदारी आहे ना सरकार तुझे?
नको संपवू आयुष्याला शेतामधल्या झाडावर
बळिराजा रे! विसरलास का तू सारे अधिकार तुझे?
दान न देता पुण्य हवे का मंदिरातल्या गाभारी?
आल्या गेल्यासाठी उघडे कधीच नसते दार तुझे
३.
रोजची पोथी, पुराणे वाचताना पाहिले
माणसाने माणसाला मारताना पाहिले
देत वचने, भूलथापा काढली वर्षे किती
स्वार्थ पाहुन राजकारण चालताना पाहिले
भीक आणिक भूक जेथे रोज आहे वंचना
दानपेट्यांतून लाखो वाहताना पाहिले
याच मातीतून फुलती केवढी रंगित फुले
रंग जातीतून येथे वाटताना पाहिले
प्राक्तनाला अनुभवाची ठेच जेव्हा लागली
रोज डोळ्यांतून अश्रू वाहताना पाहिले
दैव देते कर्म नेते माहिती असते तरी
नित नव्या नवसास सिद्धी मागताना पाहिले
..................................................................
No comments:
Post a Comment