मराठी गझलेला नवे आयाम प्रदान करणारा गझलसंग्रह : दिशांतर : अशोक म. वाडकर

 



डॉ. स्नेहल विनय कुलकर्णी या गारगोटी (जि.कोल्हापूर) येथे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. त्या गझल मंथन साहित्य संस्था, कोरपनाच्या मार्गदर्शक समितीच्या पदाधिकारी असून त्या अनेक ऑनलाईन व ऑफलाईन कार्यशाळेवर गझलसाधकांना मार्गदर्शन करत आहेत. कोल्हापूरस्थित 'गझलसाद' या समूहाच्याही त्या  सदस्य आहेत. त्यांचा 'दिशांतर' हा दुसरा गझलसंग्रह पन्हाळा येथे गझल मंथन साहित्य संस्थेच्या एक दिवसीय गझलसंमेलनात समारंभपूर्वक प्रकाशित झाला.


'पाताळ शोधल्यावर तारे मला मिळाले

मी थांबले तरीही झाले कसे 'दिशांतर'


अशी आपली भूमिका गझलकारा 'दिशा' - डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी संग्रहाच्या प्रारंभीच व्यक्त केली आहे; तर हा संग्रह त्यांनी आपले वडील श्री चंद्रकांत इनामदार यांच्या स्मृतीस आदरपूर्वक अर्पण केला आहे.  सुरुवातीस डॉ. स्नेहलमॅडम यांनी आपले दिलखुलास मनोगत व्यक्त केले आहे.


संग्रहात विविध वृत्तांतील एकूण ११० गझलांचा समावेश केला आहे. संग्रहातील गझलांमधून स्रीमनातील भावभावनांचे तरल चित्रण केलेले आढळते. वास्तवाच्या सत्याशी मानवी मनोव्यापारांची आध्यात्मिक बैठक लाभलेली गझलकारा अशी डॉ. स्नेहलजी यांची सर्वदूर ओळख आहे. या संवेदनशील गझलकारांची शब्दसंपदा अतिशय समृद्ध, हळूवार, गझलेचे तंत्र व मंत्र सांभाळणारी, निर्दोष अशी असून त्यांची अभिव्यक्तीची शैली (अंदाजे बयाँ) स्वयंभू अशी आहे. तीमध्ये पूर्वसुरींच्या अनुकरणाची किंचितही छटा आढळत नाही हे तिचे वैशिष्ट्य मानावे लागेल. त्यांच्या गझला वैचारिकता, संपन्नता, तंत्र व मंत्ररित्या वेधक अशा दिसून येतात. त्यांना माय मराठीच्या कसदार मातीचा घमघमता सुगंध लाभला आहे.


गझलसंग्रहास भूषण कटककर 'बेफिकीर' यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांना 'दिशा' हे उपनाम (तखल्लूस) 'बेफिकीर' यांनी सुचवले व डॉक्टर स्नेहल यांनी ते आनंदाने स्वीकारले. या उपनामाची गुंफण मक्त्यामध्ये विविध अर्थपूर्ण संदर्भात डॉ. स्नेहल मॅडमनी अत्यंत खुबीने करून मराठी गझलेस एक नवा आयाम प्रदान केला आहे. 'दिशांतर'ची मलपृष्ठावरील उचित पाठराखण नामवंत गझलकार डॉ. शिवाजी काळे सरांनी केली आहे. तीमध्ये ते म्हणतात - "निव्वळ कल्पनेच्या भराऱ्या मारून तत्कालिक आनंद न देता आपल्या शेरांमध्ये वाचकांना चिरकाल गुंतवून ठेवण्याचे कसब त्यांच्या लेखनात असल्यामुळेच त्या सध्याच्या काळातील एक महत्त्वाच्या गझलकारा ठरल्या आहेत. 'दिशांतर' मधील प्रत्येक गझल वाचकांच्या भावविश्वाशी एकरूप होऊन त्याचे अंतर्मन उलगडून तर दाखवतेच पण वेगवेगळ्या अस्पर्श खयालांच्या माध्यमातून गझलेचा आणि गझलकाराच्या प्रतिभेचा प्रचंड आवाका लक्षात आणून देते."


'दिशांतर' मधील मला भावलेले काही शेर वानगीदाखल खाली देत आहे. त्यामुळे अशा अनेक तरल शेरांनी ओतप्रोत वाचनीय व संग्राह्य अशा ह्या डॉ. स्नेहलजींच्या गझल संग्रहाचा प्रातिभ आवाका रसिक वाचकांस ज्ञात होईल.


'जसा होता तसा हिस्सा पुन्हा होईल काळाचा

 धुक्यासमवेत आलेला हिवाळा मोसमी नाही


 सुखाची साधना म्हणजे नकोशी वेदना नाही

 व्यथा शृंगारणे म्हणजे सुखाची बेगमी नाही'


'याहून कोणती मोठ्ठी नशिबाची थट्टा नाही

हमरस्ता अनोळखी अन् पाऊल मोडके आहे


मी नास्तिक माझा वाटा मागू तरी कुणाला?

रांगेत उपासक सगळे अन् तीर्थ मोजके आहे'


'जन्माने बुद्धू समजत सगळ्यांनी धडे शिकवले

वागले अडाणी तितकी मी ठरले पुढे शहाणी


घेताना पत्ता माझा अभ्यास हवा जादाचा

मी 'दिशा' वाट चुकलेल्या काळाची आणीबाणी'


'दिशा पिंजूनही हाती कवडसा लागला नाही

 अवस शृंगारण्यासाठी पकडला काजवा तुम्ही


सुकत गेली पुढे दोन्ही ठिकाणी नाळ पाण्याची

कशाला काढला छोट्या नदीला कालवा तुम्ही


करूया साजरा उत्सव तरी शास्त्रोक्त रीतीने

'दिशा' घालेल रांगोळी नगारे वाजवा तुम्ही'


'छापून आली लोकसंख्या पण मला पटली कुठे

 गर्भात मेलेल्या मुलींची माहिती कळली कुठे?'


'दिशांतर' गझलसंग्रह गझल विश्वातील ख्यातकीर्त गझल मंथन प्रकाशन संस्था, कोरपनाच्यावतीने जयवंत भा. वानखडे यांनी प्रकाशित केला आहे. संग्रहाची निर्मिती दर्जेदार झाली असून संग्रहाच्या शीर्षकास साजेशी मुखपृष्ठ रचना संतोष घोंगडे यांनी केली आहे. 

-------------------------------------------------------------------+

गझलसंग्रह : दिशांतर

गझलकारा : 'दिशा' - डॉ.स्नेहल विनय कुलकर्णी

पृष्ठ संख्या : १२६,  मूल्य : २५०/- रुपये

प्रकाशक : गझल मंथन प्रकाशन, कोरपना

No comments: