पुरोगामित्वाने अंकुरलेला गझलसंग्रह : मी कातळ काठावरचा : महेश भिसे




सातारा गझलकट्ट्यावर गझलस्नेही डॉ. राज रणधीर (जालना) यांनी मला डॉ. यशवंत मस्के यांचा 'मी कातळ काठावरचा' हा गझलसंग्रह  गझल अभ्यासासाठी भेट दिला होता. सातारा संमेलनातून घेतलेले बहुतांश गझलसंग्रह वाचून मी त्यावर गझलेचा विद्यार्थी म्हणून माझ्या मतीने व्यक्त होत गेलो. ही माझ्या गझल साधनेतील एक समाधानकारक व शिकण्याच्या प्रक्रियेत भर घालणारी गोष्ट आहे. इतर गझलसंग्रह व गझलकार यशवंतजी मस्के यांचा 'मी कातळ काठावरचा' हा गझलसंग्रह यामध्ये एक ठळक वेगळेपण दिसून येते. ते म्हणजे यांनी आपल्या गझलेत सौजन्य व शिष्टाचार राखून सौम्य विद्रोह केला आहे. पुरोगामी विचारांची मशाल त्यांनी हाती घेतली आहे. गझलकार मस्के यांनी आपली लेखणी विविध सामाजिक विषयावरील सत्यता दाखवण्यात यशस्वीपणे वापरली आहे. साहित्यिकाने आपल्या लेखणीचा वापर सत्य दाखवण्यासाठी करणे एक सामाजिक परिवर्तनाचे क्रांतिकारक पाऊल इतिहासातही ठरले होते आणि आजही ठरले जाते. याची प्रचिती असलेले गझलकार यशवंतजी मस्के निर्भीडपणे सत्य लिहण्यासाठी आपल्या लेखणीचा वापर करणार असल्याची जणू प्रतिज्ञा घेत असल्याचे सांगत ते खालील एका शेरात म्हणतात, 

'तलवार म्यान होते पाहून लेखणीला

जे सत्य तेच आता लिहिणार यापुढे मी.'


'जर पीक समतेचे हवे अन् बंधुतेचे फळ नवे 

शाहू फुले आंबेडकर डोक्यामधे पेरून बघ.'


जातिभेदाच्या भिंती उभ्या असलेल्या भारतीय समाजव्यवस्थेविरुद्ध लढा देत शाहू, फुले, आंबेडकरांनी समता, बंधुता, समानता व मानवता ही मूल्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु आजच्या समाजव्यवस्थेत शाहू, फुले, आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली ही मूल्ये आवश्यक त्या प्रमाणात रुजू शकली नाहीत. आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक युगातही जात आणि धर्म या संकल्पनांना माणूस चिकटून राहिला. त्यामुळेच समाजात ही मूल्ये रुजवण्यास असमर्थ ठरला. ही मूल्ये सक्षमतेने  रुजवण्यासाठी आजच्या समाजात शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेचे बीज लावून समतेचे पीक उगवल्यावर बंधुतेचे गोड फळ हवे असेल तर ही विचारधारा आपण सर्वांनीच मेंदूत पेरली पाहिजे असे आवाहन गझलकार वरील शेरात करत आहेत. शाहू फुले आंबेडकर विचारधारा समाजात रुजवू पाहण्याचे कार्य गझलकार आपल्या लेखणीने करत असल्याचे दिसून येते. 


माझ्यासारखे असंख्य शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला यावेत म्हणून शिवाजी महाराजांनी असंख्य पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रेरणादायी इतिहास निर्माण केला. परंतु तो इतिहास स्वतः विचारपूर्वक वाचून त्यातून बोध घेऊन मागच्या अनेक पिढ्यांपासून ते आजच्या पिढीपर्यंत शिवाजी महाराजांसारखा महापराक्रमी कुणीच जन्माला आला नाही. याचे पहिले कारण स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतरच्या काळात शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजामातेच्या संस्कारगुणांचा अभाव निर्माण झाला. शिवाजी महाराजांना बालपणीच घडवणारी संस्काराची खाण आई जिजाऊ समाजात जन्माला यायची बंद झाली. संस्कारांचा ऱ्हास करणाऱ्या पिढ्या जन्माला येत गेल्या. पुढे नंतरच्या आधुनिक काळात इतिहासाचा विपर्यास झाला व शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करण्यात समाज यशस्वी झाला. महाराजांच्या विचारांची पायमल्ली होत असताना एका विशिष्ट मानसिकतेच्या वर्गाला शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत असे वाटू लागले पण तो शिवबा आपल्या घरी जन्मू नये शेजारी जन्मावा. ही सत्य वस्तुस्थिती गझलकार अत्यंत चिकित्सकपणे सामाजिक भानातून खालील दोन शेरामंधून मांडत आहेत. 


'जरी जन्म घ्यावा शिवानेच वाटे

तरी का कुणातच दिसेना जिजाऊ'


'चिडचिड होते अन्यायाची आज परंतु हिम्मत नाही

शिवबा जन्मो पण शेजारी नवस असा मी करतो आहे.'


या जगातल्या बहुतांश गोष्टी नाशवंत आहेत. कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही. अगदी आपल्याला मिळालेला मानव जन्मही नाशवंत आहे. एक दिवस माणसाचाही देह नष्ट होऊन जातो हे पूर्णसत्य आहे. परंतु आयुष्यभर माणूस पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, सात जन्म अशा अतार्किक गोष्टींवर विश्वास ठेवून आपले जीवन पुढे ढकलत असतो. आजच्या बदललेल्या जगात माणूस स्वाभिमानाच्या नावाखाली स्वतःच्या अहंकाराला कुरवाळत बसलेला असतो. केवळ पैसा व भौतिक सुखांच्या मागे धावत असतो. पैसा हेच जणू माणसाचे सर्वस्व झाले आहे. हाडामासाच्या सजीव माणसापेक्षा कागदाच्या निर्जीव पैशाला आज जास्त किंमत दिसून येते. त्यामुळे माणसाची माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची दृष्टी अंधुक झाली आहे. माणूस माणसाच्या नजरेत घसरत चालला आहे. उच्च नैतिकमूल्ये, चांगली विचारसरणी यामुळे माणूस काळानुसार बदलेल किंवा सुधारेल असे वाटत असतानाही माणूस सुधारला नाही. त्यामुळे माणुसकीची तब्येत बिघडत चालल्याची खालील शेरांमधून खंत व्यक्त करताना गझलकार दुसऱ्या बाजूने मानवता रुजवण्याचा आपल्या गझलेतून प्रयत्न करत आहे. 


'मानवाचा जन्म नश्वर जाग आता माणसा 

माणसाशी माणसासम वाग आता माणसा'


'मूल्यवर्धनासाठी आता काय करावे

रुपयावानी मानव खाली घसरत आहे.' 


'वाटत होते काळ जरासा सुधारेल पण

मानवतेची तब्येत पुन्हा बिघडत आहे.'


मराठी गझलशास्त्राला हवी असलेली उच्च प्रतिभा, शेरात प्रतिमांचा प्रभावी वापर व शेराचे आशयसौंदर्य यामुळे हा गझलसंग्रह चांगलाच सजला आहे. हे खालील काही शेरांवरून कळून येते. 


'नकोस टाकू मला कुठेही 

तुझा हवे तर रुमाल कर तू'


'केली कुणी कळेना इतकी भिकार चोरी

घर सोडले नि केले नुसतेच दार चोरी'


'ती सरिता निखळ तिला तर मन भरून जगता येते

मी कातळ काठावरचा मज कुठे वाहता येते'


बहुरंगी आणि बहुआशयाच्या समृद्धतेने नटलेला हा गझलसंग्रह सत्यावर आधारित आहे. गझलकाराने सत्य लिहिले आहे, मांडले आहे आणि त्याआधी ते जगलेही आहे. जात-धर्म या माणसाच्या प्रगतीत अडसर ठरण्याच्या व माणसा-माणसात भेद निर्माण करणाऱ्या गोष्टीवर ।गझलकार सौम्यपणे विद्रोह करत व्यक्त झाला आहे. बऱ्याच सामाजिक विदारक वास्तवाचे गझलकाराने आपल्या लेखणीने सत्य दाखवण्याचे धाडस केले असल्याने संपूर्ण गझलसंग्रहाला पुरोगामित्वाचा अंकुर फुटला आहे. गझलकार यशवंतजी मस्के यांची गझल भरपूर समृद्ध होत राहो या अनंत शुभेच्छा.

_____________________________________________

No comments: