तीन गझला : विनोद देवरकर

 



१.


शेतात राबणारे तू माय-बाप आठव

नशिबास वाचणारे तू माय-बाप आठव


‘हर फिक्र को..’ म्हणोनी सिगरेट फुंकताना

आयुष्य जाळणारे तू माय-बाप आठव


शेती विकून आता तू कर्ज फेडशीलच.. 

तिज माय मानणारे तू माय-बाप आठव


येऊ दिला न त्यांनी आवाज बर्तनांचा..

उपवास ठेवणारे तू माय-बाप आठव


केलेच काय तुम्ही? हा प्रश्न टाकण्याधी..

तुज घास भरवणारे तू माय-बाप आठव


२.


दुःखास तू ओवाळ अन् जगण्यावरी भाळून जा

आनंद या गुंत्यातला नात्यांमधे माळून जा


ज्यांनी दिला धोका तुला प्रेमात अन् युद्धातही..

कर माफ अन् त्यांच्यावरी तू जीव ओवाळून जा


अलवार ती फुंकर तुझी गाईल जेंव्हा बासरी..

त्या मोरपंखी कामना हळुवार तू जाळून जा


धन, रूप, नाती कोणती.. येणार नाही सोबती;

कवटाळ गझलेला उरी आत्म्यास तेजाळून जा


का आपल्यांनी जीवनी लाथाडले तुला इथे?

कोठे कधी चुकले कसे व्यवहार तो ताळून जा


तो बोलला नाही मला; ही खंत बाजू सारुनी.. 

जा! शेवटी सरणावरी, तू आसवे गाळून जा!


३.


भक्तामुळेच सत्ता; खोटा प्रचार नाही

झाली रसद पुरेशी आता शिकार नाही


सांगू कितीकदा मी हे सत्य वासरांनो

माझ्याशिवाय कोणी येथे हुशार नाही


दिसणार ना मलाही कोणी समान येथे 

धर्मांध होत आहे; साधा विकार नाही


टाळू जरा इशारे अलवार पापण्यांचे..

मौनात बोलण्याचा अपुला करार नाही


वैकुंठ गाठणाऱ्या अप्रूप त्या तुक्याचे..

जीतेपणी मराया.. कोणी तयार नाही


झाले म्हणे अताशा ते संघटीत सारे.. 

करती मिळून चोरी कोणी चुकार नाही


कोर्टात केस माझी लढवून पाहिली मी..

मी हारलो नि कळले, यासम जुगार नाही

.................................................................


1 comment:

Anonymous said...

सुंदर प्रस्तुति
वाहहहहहहहहहहहहह