इरादा : विजयानंद जोशी

 



गझलकार केदार पाटणकर यांचा 'इरादा' हा संग्रह नुकताच वाचला. त्यांच्या गझला मला आवडल्या. गझल या विधेचे मर्म त्यांना उत्तमपणे गमले आहे.


'एक हसरी आमच्या वर्गात आली

आमचे झाले पुढे शिक्षण गुलाबी'

अशा कसदार शेरांनी संग्रहाची छान सुरुवात होते. मग पुढे


'सूर्य जाताना नभाला केशरी बनवून जातो

रंग स्वप्नांचे मनाला आणखी माखून जातो'

अशा शेराने रंगत वाढत जाते...


'हे खरे की एक सुंदर घर मिळाले

मात्र त्या बदल्यात हिरवे शेत गेले'


'भेट घडवू अशी आज आपण मनाची

की जणू यापुढे भेटणे शक्य नाही'


'चर्चेत असण्याची कला, पैसा नि अनुयायी

हा मार्ग सोईस्कर तुलाही वाटला आहे'

या शेरांमधली अभिव्यक्ती नेमकी, सशक्त आहे. 


'आमीष आहे कोणते, आहे प्रलोभन कोणते?

दुनियेत येण्याचे तुझे नक्की प्रयोजन कोणते?'


'प्रेम नावाचा धडा जर भावला आहे तुला तर

रोज वाचू तोच आपण, पान उलटावे कशाला!'


'खेळ प्रीतीचा सुरू झाला मनोरम

सांग केली नेमकी सुरुवात कोणी?'


'शक्य नव्हते कुंचल्याने काढणे

चित्र मी शब्दांतुनी साकारले'


असेही अनेक कोणताही अभिनिवेश नसलेले शेर भावण्यासारखेच!

अनेक मुरद्दफ रचनांमधे वेगवेगळ्या दुशब्दी, त्रिशब्दी रदीफचा केलेला वापर चपखल वाटतो. विषयवैविध्य, आशयाची घनता आणि खयालांचे गझलसुसंगत प्रकटन या निकषांवर संग्रहातल्या गझला छान उतरल्यात. सर्वमान्य आशय उठावदार करून मांडण्याचं कसब चांगलं आहे. अनेक शेर कवितेच्या मातीतून आलेले आहेत जे कविता आणि गझलेतले अद्वैतच स्पष्ट करतात. प्रमोदजींची प्रस्तावना संग्रहाबद्दलची उत्सुकता वाढवते आणि चिंचकरजींची निर्मिती देखणी आहे.

     

शेवटी, मला जाणवलेल्या काही त्रुटी नोंदवतो. पृष्ठ २१ वरच्या 'एक सहवास' या गझलेतले शेर फारसे प्रभावी वाटले नाहीत. पृष्ठ १८ वरच्या गझलेतल्या दोनतीन शेरात 'राणी' हा रदीफ तितका मिळून आलाय असं नाही वाटलं.

एकूणात, केदारजींचे गझलविश्वात झालेले हे 'स्वयं'सिद्ध 'संग्रह'णीय पदार्पण दमदार आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

...................................................................................

● इरादा

● केदार पाटणकर

● स्वयं प्रकाशन, सासवड, पुणे

● पृष्ठे ७२

● किंमत ₹ १५०/-

______________________________________________





1 comment:

Anonymous said...

केदारजी एक सशक्त गझलकार आहेत.