तीन गझला : अपूर्व राजपूत





१.


उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला 

सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला 


फार वर्षांनी सरळ आलो तुझ्या दाराजवळ 

एवढ्या वर्षांतही लक्षात रस्ता राहिला 


सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो 

यामुळे राधे, तुझा हा कृष्ण काळा राहिला


बिलगल्या लाटा तरी भिजता न आले शेवटी 

ओल शोधत जन्मभर शापित किनारा राहिला


२.


प्रश्न हा पडतो निरंतर आपल्याला

प्रश्न का पडतात शंभर आपल्याला?


ऊब होती एकमेकांची म्हणूनच

लागला नाही डिसेंबर आपल्याला


जे नको असतात नंबर फोनमध्ये 

पाठ ते असतात नंबर आपल्याला


एवढी आहेस तू सुंदर म्हणूनच

बाळही होणार सुंदर आपल्याला


आपल्या जखमा जुन्या कुरवाळणारे 

आवडत असतात शायर आपल्याला


ज्या मुलींवर भाळतो आहोत आपण 

त्या म्हणत बसतात, "सर! सर!" आपल्याला


३.


तुझी आठवण इतकी का ओरडते रात्री

दुःख मनाचे कुणास इतके कळते रात्री


दिवस उगवता मी जखमेला कोरत बसतो

उगाच नाही जुनी जखम भळभळते रात्री


तिची आठवण आली की मी फोटो बघतो

तीही माझ्या कविता वाचत बसते रात्री


रोज सकाळी उशी ओलसर दिसते माझी

मी निजल्यावर कोण एवढे रडते रात्री


माझ्यावरती चिडली, रुसली किती जरी ती

कूस तिची माझ्या बाजूने वळते रात्री


जगापुढे ठरवून अंतरच पाळत असतो

दोघांमध्ये घडू नये ते घडते रात्री


शुभ्र चांदणे, एक डायरी, तुझी आठवण

अर्धी कविता सुचलेली तडफडते रात्री

................................................................



No comments: