दोन गझला : कीर्ती वैराळकर

 



१.


समजेस्तोवर पान एकही गळले नाही 

कीड लागली नात्याला हे कळले नाही


उच्च प्रतीची नशा तुझी ही माझ्यावरती 

चढली होती... पण पाउल अडखळले नाही


भरडत आहे मला जिंदगी अशा खुबीने

पिठासारखे मला कुणीही दळले नाही


किती खोलवर जखमा होत्या मनात माझ्या

एक थेंबही रक्त खरे भळभळले नाही


तुझी आठवण क्षणाक्षणाला चटका देते

म्हणून माझे प्रेत चितेवर जळले नाही


२.


खरे तर वाद दोघांचे तसेही लाजमी होते

नको कळवूस दुनियेला उगीचच बातमी होते


मला तू भेटल्यावरती निसटला तोल का नकळत

तुला भेटायच्या आधी तशी मी संयमी होते


सुखी दिसली कधी त्याला किती नाराज होतो तो

मला जर दुःख झाले तर व्यथा त्याची कमी होते.


मला तर एकदाही येत का नाही खरी जोडी

कशी दुःखा तुझी एकाच पत्त्याने रमी होते


जिव्हेला लावली आहेस इतकी धार तू हल्ली 

तुझे समजून घेताना कितीदा मी शमी होते

.....................................................................



.


No comments: