१.
भ्रूणास ना खुडावे पापात ना बुडावे
कन्येस वाढवूया ज्योतीस अति जपावे
"नारी महान आहे पूजेस पात्र असते"
वाणीत एक भाषा क्रौर्यास निज बघावे
मुंगीस मारताना काळीज थांबते पण
महिलेस जाळताना देहात मन नसावे
कमळावरी पदाला हळुवार ठेवतो तो
भृंगास आठवूनी नारीस तोषवावे
चिमणीस त्यागताना बुद्धी गहाण असते
सर्वत्र पुरुष असता जग हे कसे टिकावे?
चिडचिड न तू करावी चित्तास जागवावे
मुलगी जणू धरित्री स्वागत तिचे करावे
२.
नव्या युगाची युगंधरा मी अन्यायाला देते टक्कर
माझ्यावरती हात उचलला सदन सोडले क्षणात सत्वर
संसाराचे कच्चे धागे टीप घातली कधी न जुळले
मुळी न झाला उपाय त्यावर किती लावले सुंदर अस्तर
वादाला त्या अडसर नव्हता कुंभाराचे फुटते खापर
रोज रोजच्या मरण्याला पण नसे मिळाले कधीच उत्तर
नाटक नाही नसे चित्रपट जगणे केवळ रटाळ झाले
रोज रोज पण रांधत असता कढईसम मी झाले ठिक्कर!
नाही गप्पा नव्हत्या गोष्टी उपेक्षिता मी सदा राहिले
एके दिवशी स्फोट उडाला कारण जीवन बनले दुस्तर
जीव आंबला शिळ्या कढीसम मार्ग दिसेना काय करावे?
नाव, घराणे, कीर्ती, महिमा... उकळत होते मनात अत्तर!
सहनशीलता स्त्रीचे भूषण सहन करावे निमुटपणाने
कडेलोट पण अगम्य झाला मी न ऐकले... झाले पत्थर
३.
दुष्कर्म सोडुनी कर उपयोग जीवनाचा
भाग्यामुळे मिळाला हा जन्म माणसाचा
प्राणासमान जप तू वचने कुणा दिलेली
तव जीवनी असू दे आदर्श दशरथाचा
सर्वत्र आज दिसतो बाजार शोषणाचा
जो तो हपापलेला निदिध्यास वैभवाचा
गावात दोन बंधू विस्तव न जाय अडवा
रक्तास जागुनीया घे पाठ लक्ष्मणाचा.
नसते कठीण तरुणा चारित्र्यवान बनणे
कायम ठसा असावा राजा रघुत्तमाचा!
...............................................................

1 comment:
सुधाताई,
तीनही गझला खूपच प्रेरणादायक आहेत ....
आवडल्या ....
🌹
Post a Comment