१ .
किती ह्या वावड्या उठल्या कशाही
सहावे लागले त्याला, मलाही
नको पाहू कुणाची वाट आता
ऋतू आला तसा तो संपलाही
तुझ्या ना लागले काही मनाला
मलाही वाटले नाहीच काही
जिथे ब्रह्मांड मी साकारलेले
तिथे आता म्हणे काहीच नाही
नको आता पुन्हा लिहिणे कशावर
नको मागे पुन्हा खाणा खुणाही
अनर्थाचे कसे झेपेल ओझे
कशाला अर्थ काढावा कसाही
कसा आहेस तू मी काय सांगू
जसा नाही मला दिसतो तसाही
बदलतो रोज कोणी चेहरे अन्
कुणी आहे तसा आजन्म राही
२.
जर दैव कृपाळू माझे
का नशीब चाळू माझे?
डोळ्यांनी माया करते
डोळे मायाळू माझे
का मलाच स्पर्श करू मी
का हात विटाळू माझे
माझ्या सभोवती जाळे
ये, जळमट जाळू माझे
मी सहाण पापी आहे
चल पुण्य उगाळू माझे
माझेच राहिले नाही
आता घर टाळू माझे
निष्ठूर रात्र सरकेना
पण दिवस दयाळू माझे
टिकणे तर कठीण आहे
खचणे सांभाळू माझे
.....................................................

No comments:
Post a Comment