१.
एकाचे वास्तव दुसऱ्याचे स्वप्न असू शकते
स्वप्न पाहणे एखाद्याचा शाप ठरू शकते
ओटीपोटातील कळा पाहून समजले की
शाप आणि वरदान तिला एकत्र मिळू शकते
झाडुन घे पालापाचोळा पूर्वग्रहांचा तू
नंतर हिरवीशी प्रेमाची वाट दिसू शकते
सोडुन दे ना तुझा अबोला पाठव ना...'मिस यू'
लगेच दुसऱ्या क्षणी तुला ती फोन करू शकते
मान्य मला आहे की आहे माणुसघाणा मी
पण माझ्याही फॉलोवर्सची रीघ दिसू शकते
देण्याआधी दुवा जगाला विचार कर थोडा...
दान म्हणुन जी घेतलीस ती भीक असू शकते
बिघाड झालेल्या यंत्राचे तरी ठीक आहे
सांगा मी आयुष्य कसे रिस्टार्ट करू शकते?
२.
आठवांच्या उंबऱ्याशी ढाळला पाऊस मी
तू दिलेल्या वेदनेवर गाळला पाऊस मी
कागदावर पूर आला का अवेळी नेमका
कोरड्या शब्दांत जेंव्हा चाळला पाऊस मी
मळभ येते पापण्यांवर मग झरावे वाटते
याचसाठी तर घरातच पाळला पाऊस मी
मोगरा परसातला झिडकारले त्याने मला
त्यामुळे वेणीत माझ्या माळला पाऊस मी
सवय असते जीवघेणी मी मला समजावले
लाखदा भिजण्याअगोदर टाळला पाऊस मी
वैर धरले सावल्यांशी मग उन्हे कवटाळली
आतला मुद्दाम माझ्या जाळला पाऊस मी
३.
कुणी कुणाच्या असण्याने अवघडला होता
कुणी कुणाच्या नसण्यावरती चिडला होता
हातपायही मारायाचे कष्ट कशाला
म्हणून कोणी पुरात अलगद बुडला होता
तिखटाची गोडाशी मैत्री झाली नाही
ज्याचा त्याचा स्वभाव त्याला नडला होता
पुढ्यात माझ्या पक्वान्नांची ताटे होती
दात नेमका अशाच वेळी किडला होता
ज्या शेराला खोडायाचा विचार केला
तोच नेमका तुला कसा आवडला होता
डबके होणे बहुधा माझ्या नशिबी होते
म्हणून रस्त्यावरती खड्डा पडला होता!
...............................................................

3 comments:
वाहवा, अभिनंदन! अर्थपूर्ण व प्रगल्भ गझला.Keep it up dear!
Wonderful Gazals! Would love to read more such compositions!!
खूप छान भैरवी,अशीच लिहीत जा हीच सदिच्छा
Post a Comment