मराठीच्या ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि आद्य महिला गझलकारा म्हणून गझलविश्वामध्ये ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते त्या संगीताताई जोशींचा ‘दीवान-ए-संगीता’ हा दीवान प्रत्यक्ष त्यांच्या हातून सस्नेह भेट म्हणून हातात पडणे ह्यापेक्षा आणखी काय भाग्य असू शकतं? काळजाच्या कुपीत कायम जपून ठेवावा असा हा क्षण!
त्यांच्या कवितांवर/गझलांवर काही भाष्य करण्याची माझी पात्रता नाही ह्याची पुरेपूर जाणीव मला निश्चितच आहे. पण एक सामान्य रसिक या नात्याने त्यांच्या आवडलेल्या शेरांपैकी काही मोजके शेर या लेखात नमूद करते आहे.
तसे तर संगीताताई म्हटल्याबरोबर सर्वप्रथम आठवते ती त्यांची सर्वाधिक गाजलेली गझल 'आयुष्य तेच आहे'
खरं तर इतक्या छोट्या बहरमध्ये, इतक्या साध्या शब्दात प्रत्येकाच्या आयुष्याचं प्रतिबिंब दाखवणारं इतकं नेमकं, इतकं आशयघन लिहिता येऊ शकते हे बघूनच आपण स्तिमित होतो. त्यातल्या शेरांचा साधेपणा, त्यातली सहजता आणि त्याबरोबरच त्यातली प्रामाणिक अभिव्यक्ती आपल्याला भावून जाते. उदाहरणादाखल त्यातले हे काही शेर बघा.
'आयुष्य तेच आहे
अन् हाच पेच आहे
कोणी न सोबतीला
हेही बरेच आहे
कोणी नसे कुणाचे
बस! सत्य हेच आहे
मी चालते तरीही
आहे तिथेच आहे
हे दुःख नेहमीचे
होते तसेच आहे'
संगीताताईंचा कुठलाही शेर वाचताना प्रत्येकाला जणू काही हा शेर आपल्यासाठीच तर लिहिलेला नाही ना असे वाटत राहते. मला वाटतं हेच तर खऱ्या अर्थाने त्या शेराच्या यशाचे गमक असते. आणि संगीताताईंचे असे कित्येक शेर आपल्याला जिंकून घेतात. अतिशय थोडक्या शब्दात जीवनातील काही त्रिकालाबाधित सत्य त्या आपल्या गझलांमधून सहज सांगून जातात. शिवाय हे सांगताना त्यात कुठलाही अभिनिवेश किंवा आव नसून अगदी सहजतेने त्यातून तो-तो भाव व्यक्त होतो.
वर्तमानासवे जायचे पुढे
मागचा काळ तू आठवू नको
किंवा समाजात दिसणारी भोंदूगिरी, बुवाबाजी, देवाचा मांडलेला बाजार इत्यादींवर भाष्य करणारा हा त्यांचा शेर बघा,
'राहू द्या या पत्थराचा मूळचा साधेपणा
हा असा शेंदूर त्याला सारखा फासू नका'
जीवनाच्या प्रवासात प्रत्येकाला अनेक बरे-वाईट अनुभव येतच असतात. आयुष्य सरळसोट कधीच नसते. चढ-उतार असतातच आणि अशावेळीच आपले कोण आणि परके कोण यांची पारख होते. प्रत्येक वेळी खोटे-खोटे गोड बोलणारे संधी मिळताच कसा घात करतात हाही अनुभव नित्याचाच असतो. “भीक नको पण कुत्रे आवर” असं म्हणण्याची वेळ कित्येकदा येते. समोरच्याचा दुटप्पीपणा, मानभावीपणा स्पष्ट दिसत असतो.
ग्रीष्म साहिनही मुकाटपणे
सावलीचा परंतु भास नको
मैत्रीतसुद्धा खरं-खोटं पारखणे तसे अवघडच असते हाही सर्वसामान्यपणे सगळ्यांचाच अनुभव. पण त्याला इतक्या खुबीने व्यक्त करणे ही बाकी प्रतिभाच!
जीव घेतात मित्रही आपले
दुष्मनांची उगा मिजास नको
सुख-दुःख ही संकल्पनाच तशी तर सापेक्षच. ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे’ ही सुद्धा सर्वांचीच कथा. सुख-दुःखाचं हे व्यस्त प्रमाण काही नवीन नाही. संगीताताई हे किती निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त करतात बघा.
'सौख्यालाही केव्हा केव्हा होते दुःख
थोडा वेळच टिकतो आपण याचे दुःख'
'एकदा दुःखास केले आपलेसे
दुःख तेव्हापासून कसलेच नाही'
'कल्पनचित्रही रंगवावे कसे
मी सुखाला कधी भेटलेही कुठे?'
सुख-दुःखाप्रमाणेच हार-जीत हाही जगण्याचा अविभाज्य घटक आहे. जिंकणे सोपे नसतेच, हार पचवणे तर त्याहून अवघड. कधी-कधी तर हार फार जिव्हारी लागणारी असू शकते. मात्र जगण्यात हे चढ-उतार असल्याशिवाय त्याची लज्जत ती काय? हार-जितीच्या या खेळाकडे, आयुष्यातल्या ताणतणावाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या या गझलेत दिसून येतो.
'हारण्या नवीन एक डाव पाहिजे
साकळे जुना, नवीन घाव पाहिजे'
'तार जीवना तुझी सुरेल वाजण्या
योग्य तेवढा तिला तणाव पाहिजे'
'पाय चालतील हे अनंत काळही
शेवटी परी तुझेच गाव पाहिजे'
सुखाचे सारेच सोबती असतात. तुमची रडगाणी ऐकून घ्यायला कुणाला फुरसत असते? जो-तो आपापल्या तंद्रीत कशाच्या तरी मागे धावत असतो. नक्की कशासाठी ही धावपळ हेही कित्येकदा त्याचे त्यालाच माहिती नसते. पुढील दोन शेरांमध्ये हे किती यथार्थपणे सांगितले आहे.
'मैफलीला आज गर्दी फक्त बहिऱ्यांची
वेदनेने गीत आता गायचे कोठे?'
'जायचे सारे प्रवासी त्याच गाडीने
माहिती नाही कुणा उतरायचे कुठे?'
हे विश्व असे काही अनाकलनीय, अद्भुत आहे की त्याचा अजिबात थांग लागत नाही. त्याचा उफराटा न्याय कित्येकदा आपल्याला संभ्रमात पाडतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, तर कधी-कधी जवळच्या माणसांच्या वागण्याची विक्षिप्त तऱ्हा आपल्याला चांगलंच बुचकळ्यात टाकते. हाच जगण्यातला विरोधाभास पुढच्या शेरात किती सुंदररीत्या प्रकट झाला आहे.
'जिवंत जो त्याला बुडवी नेऊन तळाशी
निर्जीवाला उचलून वरती धरते पाणी'
संगीताताईंच्या शेरांमध्ये त्यांनी वापरलेली प्रतीके अतिशय बोलकी अन् चपखल आहेत. उदाहरणादाखल पुढील काही शेर बघा.
'चंदनी गंध हा तुला देण्या
जन्म माझे उगाळले होते'
'भेटलो तू नि मी अशा जागी
मार्ग जेथून वेगळे होते'
'खंजिरांना दोष का मी व्यर्थ देऊ?
राक्षसी हातात ते लाचार होते'
'काल तू–मी संमतीने बांधल्या भिंती
जन्म काढू घेऊनी आपापल्या भिंती'
'दोष सर्वस्वी तुझा नाही प्रकाशा
दृष्टि माझीही जरा अंधूक होती'
'त्या खुनाचा राहिला नाही पुरावा
भोसकायाचे सुरे शब्दात होते
बोलले हासून मी जेव्हा उद्याशी
भूतकाळाच्याच मी ताब्यात होते '
त्यांच्या शेरांमधून डोकावणारा दुर्दम्य आशावाद किंवा त्यातली सकारात्मकता रसिकांना जगण्याला भरभरून सामोरे जाण्याची ऊर्जा देते.
'राखेतूनही अंकुरतिल स्वप्ने माझी
दुःखाचा हा वणवा विझल्यावर नक्की '
तुमच्या-आमच्या जगण्याचं अचूक प्रतिबिंब दाखवणारे संगीताताईंचे असे कितीतरी शेर कायम मनामध्ये घर करून राहतात. कधी जगण्यातल्या विरोधाभासावर अचूक भाष्य करत आपल्या मनाचा ठाव घेतात, कधी आयुष्यातल्या हळव्या क्षणांची आठवण करून देतात तर कधी अवघड परिस्थितीतही जगण्याची उमेद देतात.
'उरतिल मागे कवितांच्या रंगीत शिंपा
अस्तित्वाची लाट परतल्यावर नक्की'
त्यांच्या या शेरात म्हटल्याप्रमाणे संगीताताईंच्या कवितांच्या, गझलांच्या अशा अगणित रंगीत शिंपा, रसिकांना कायम भुरळ घालत राहतील यात शंका नाही.
____________________________________________
● दीवान ए संगीता
● संगीता जोशी
● प्रकाशक : अष्टगंध प्रकाशन, ठाणे
● पृष्ठे : २४६
● किंमत : ₹ ४००/-
..................................................................................

No comments:
Post a Comment