१.
पावलांना पायरीने रोज सांभाळून घ्यावे
जन्म मिळता पाकळीचा फूल तू काढून न्यावे
फुंकरीचा प्राणवायू संपुनी जावा अचानक
ओंजळीने तेवणाऱ्या तू दिव्याला सावरावे
एवढा अंधार व्हावा दोन खांबांच्या मधेही
मूठ तू झाकून घेता चांदणे हाती उरावे
फक्त पाणी आटले तर काय होईल ना जगाचे
एवढ्यासाठी नभाने चार अश्रू पाठवावे
वाचताना फुंकरीचा स्पर्श नवखा आठवावा
एवढे माझ्या मनातुन शब्द सांभाळून यावे
लाजरीचा देह आता वेदना झाकून घेतो
जीव राहू दे जरासा प्राण तू काढून न्यावे
२.
राहिली आहेच इच्छा एक साधी
वाढते आहे सुखाची रोज यादी
दुःख माझ्याही घरी येऊ पहाते
लागले आहे सुखाच्या मीच नादी
तू कशी आहेस? हे नंतर विचारा
नाव समजू दे मला तुमचेच आधी
झोपलो आहे असे दिसले तरीही
घेतली आहे मनाने मी समाधी
काळजाच्या आत ज्यांचे स्थान असते
वेगळी का लागते त्यांना उपाधी?
३.
ओळखत नाहीत काही चेहरे नंतर
सापडत नाहीत आधीची घरे नंतर
डोह होता शांत तर मी एकटी होते
तू मला सुचताच उठले भोवरे नंतर
खूप काळाने जिथे पाणी दिसत होते
आटले त्या वाळवंटातील झरे नंतर
उंच उडण्याची भिती होती मनामध्ये
सोडले त्या पाखरांनी पिंजरे नंतर
जन्मभर आई मुलांची काळजी घेते
सोडुनी जातात सगळीच पाखरे नंतर
काल पूर्वीचाच फोटो... वेगळा दिसतो
वेगळे हसतात सगळे चेहरे नंतर
एक साधा प्रश्न तर होता तुला केला
का तुझ्या डोळ्यांत दिसली ... उत्तरे नंतर
............................................................

No comments:
Post a Comment