१.
भावनांची कंपने मोजू किती?
अंतरीची वादळे पेलू किती?
पांगळे हे शब्द होती तुजसवे
गूज हे हृदयातले खोलू किती?
वेदनांचे गाव झाले हृदय हे
तोच गाडा अजुनही ओढू किती?
का दया परमेश्वरा नाही तुला?
ईहलोकी संकटे झेलू किती?
सांगुनी दुनियेस थकलो कैकदा
खूप झाले की अता बोलू किती?
माणसावर तर भरोसा खूप रे
फक्त, लोभी माणसे जोडू किती?
लाज आता वाटते 'रौशन' मला
तुज दिलेला शब्द मी मोडू किती?
२.
जरि सुगंधी बाग आहे
इश्क म्हणजे आग आहे
खूप दुर्मिळ अन् हवासा
काळजाचा भाग आहे
वासनेचा खेळ बनता
शुद्धतेवर डाग आहे
स्पर्शिते फुलपाखरूना
गोडसा अनुराग आहे
जबरदस्ती पाप मोठे
क्रोध, मत्सर, राग आहे
ज्यास मिळते प्रीत दैवी
तो खऱ्याने वाघ आहे
.......................................
ज्यास प्रेमातून धोका
डिवचलेला नाग आहे
नशिब फळता प्रीत 'रौशन'
संगितातिल राग आहे
No comments:
Post a Comment