लागली नाही जराही भणक लोकांना
नेमकी नेते कुठे ही सडक लोकांना
झाड तोडुन बनविलेल्या कागदावर मी
चित्र झाडाचे शिकवतो सुबक लोकांना
हास्य ओठांवर उमटलेले सहज दिसते
दिसत नाही काळजाची ठणक लोकांना
सोसवेना जर मना हा भार प्रेमाचा
बोल मग थोडे खरे अन् खटक लोकांना
भरत नाही कुंकवाने बोट अपुलेही
तोवरी मग लागतो का तिलक लोकांना
जवळ आले वाटते बहुधा इलेक्शन बघ
दावतो आहे पुढारी झलक लोकांना
ज्ञात आहे सत्य सारे तुज स्वतःला तर
गरळ ओकू दे किती बेझिजक लोकांना
........................................................

4 comments:
खूप छान सरजी...सत्य परिस्थिती..
संपादक आदरणीय श्रीकृष्ण राऊत सर आणि टीम सीमोल्लंघनचे मनःपूर्वक आभार.🌹
क्या बात है... बहुत बढिया...गझलकार
अभिनंदन कैलास!
Post a Comment