१.
गूढ मनाचे पुस्तक उघडुन वाचन करता येते
म्हणुन एकटा रमतो, थोडे चिंतन करता येते
स्वतःशीच स्पर्धा करण्याचा एक फायदा असतो
कधी स्वतःचे कौतुक, केव्हा सांत्वन करता येते
सळसळत्या झाडांची हिरवी बोलीभाषा कळते
गहन अरण्याच्या डोळ्यांचे वाचन करता येते
परिस्थिती पाहूनच दे तू स्वप्न मला एखादे
एकाचेच बऱ्यापैकी संगोपन करता येते
आधी क्षमता हवी हलाहल पुरते पचवायाची
तेव्हा मग अमृत मिळवाया मंथन करता येते
तिच्यामुळे तर सुगंध येतो अपुल्या आयुष्याला
झिजते आई, तिला आपले चंदन करता येते
अनुभवखाती नोंदी कर तू खाल्ल्या ठेचांच्या
तेव्हा कोठे जगण्याचे मूल्यांकन करता येते
काळजात येण्याआधी दुःखांनो कळवत जा ना
स्वागतास मग तुमच्या मस्त नियोजन करता येते
तसा स्वतःला बरा प्रकाशक म्हणवुन घेऊ शकतो
स्वतःच्याच गुणदोषांचे संपादन करता येते
२.
मिळाली मुश्किलीने जी, निघुन जाणार नाही ना
मला फसवून बेचैनी निघुन जाणार नाही ना?
पितळ उघडे जरी पडले मला त्याची फिकिर नाही
खरी चिंता मला, कल्हई निघुन जाणार नाही ना
किती अडवून धरले भूतकाळाच्या प्रवाहाला
धरण फोडून पण पाणी निघुन जाणार नाही ना
कळेना वाफ का करतो स्वतःमधल्याच पाण्याची
उगा आटत, गहन खोली निघुन जाणार नाही ना
पळत आलोय स्टेशनवर पुढिल मुक्काम गाठाया
मला भीती पुढिल गाडी निघुन जाणार नाही ना
तिला जर यायचे असलेच तर येइल कशीसुद्धा
तरी शंका पुन्हा संधी निघुन जाणार नाही ना
अता कडवटपणाचेही सुरू जोरात मार्केटिंग्
पुढे जगण्यातली गोडी निघुन जाणार नाही ना
अनामिक दहशतीने शांतताही ओरडत उठते
चुकुन जी लागते तंद्री निघुन जाणार नाही ना
‘अरुण’ काहीतरी कर दिव्य… आत्म्यालाच वाटावे
“मला सोडून काया ही निघुन जाणार नाही ना?”
३.
रुमाल टाकुन माझ्यासाठी सीट पकडले होते
पण माझ्याजागी माझ्यागत कोणी दुसरे होते
कुठे जायचे होते, कुठल्या बसमध्ये मी चढलो
कळेचना या बसचे थांबे कुठले कुठले होते
कंडक्टरने कसे काय आधीच मला उतरवले?
माझे तर ठरलेले स्टेशन बहुधा पुढचे होते
खिडकीतुन पळणारी झाडे कुणीच पाहत नव्हते
ज्याचे त्याचे डोके बस् मोबाइलमध्ये होते
मात करत सार्या वासांवर तोच गंध घमघमला
तेच हवेसे कुणीतरी बसमध्ये चढले होते
बसायला जागा नव्हती पण उभाच होतो खुश मी
बसलेले असुयेने उगाच निरखत बसले होते
माहित होते त्यांना राखिव सीटावर बसलो हे
झोपेतच असल्यागत त्यांनी डोळे मिटले होते
लक्ष पुरेपुर देउन तो बस जरी चालवत होता
डोक्यामधे विचारचक्र पण केवळ घरचे होते
कुठल्या प्रलोभनांनी गेली ती असुरांच्या मागे
फसवुन त्यांनी लाल परीचे पंख छाटले होते!
.................................................................

No comments:
Post a Comment