१.
नात्यास आहे आपल्या मी नेहमी सांभाळले
जाणीव ठेवावी असे नाही तुला का वाटले
संवाद नाही राहिला अन् गोडवा पण संपला
माझे तुझे दोघांतले आहे अताशा वाढले
मौनामुळे नाही तिची कळली कुणाला वेदना
डोळ्यांतले पाणीच तेव्हा सर्व काही बोलले
काहीच जेव्हा होत नव्हते जे हवे होते मला
कोणास सांगावे कळेना संयमाने वागले
ओलांडला नव्हता कधीही मी घराचा उंबरा
नवख्या जगाला पाहुनी होते जरा धास्तावले
२.
कोण आहे सोबतीला पाहते मी
त्याप्रमाणे वाट माझी आखते मी
वेगळे असले जरीही मत कुणाचे
ठेवुनी संयम मनावर बोलते मी
पूर्ण स्वप्ने नेहमी होतात कोठे
त्याचसाठी स्वप्नरंजन टाळते मी
निर्णयाची वेळ आल्यावर कधीही
धोरणाने अन् विचारी वागते मी
काम झाल्यावर सगे होतात परके
जगरहाटी हीच असते जाणते मी
३.
अशक्य नाही कधीच काही असे वाटते
शब्दाला त्या कायम आता दूर ठेवते
पाऊल सदा शांत राहुनी पुढे टाकते
विश्वासाची सोबत तेव्हा नित्य लाभते
अबला नाही सबला झाली आता नारी
वाट स्वतःची निर्धाराने तीच शोधते
निष्काम हवे कर्म आपले कळल्यानंतर
वैराग्याची वाट जराशी सोपी बनते
असलीनकली दुनियेमधले कसे कळावे
कळण्यासाठी तशी पारखी नजर लागते
.........................................................

No comments:
Post a Comment