तीन गझला : वंदना केंद्रे बांगर




१.


सांग ना वेगळे कसे आपण

याच मातीतले ठसे आपण .


देह तू प्राण मी जरी म्हटले

भेटतो काय फारसे आपण


पाहतो स्वप्न जिंकण्याचे पण

पोसतो आळशी ससे आपण


माणसासारखे घडू आधी

मग बघूयात आरसे आपण


एक इच्छा पुरून उरल्यावर

शेवटी कोरडे घसे आपण


२.


मनाचे पाखरू माझ्या मलाही आवरत नाही 

सुखाचा पिंजरा त्याला घडीभर सोडवत नाही 


कुणावर प्रेम करते ना कुणाशी ठेवते नाते  

म्हणे शहरास या वर्दळ कुणाची सोसवत नाही


मनावरले चरे माझ्या तुला का दाखवू दुनिये?

मला जर दुःख माझे मांडलेले आवडत नाही


तिला नाही जरी पर्वा स्वतःच्या खोल जखमांची

फिरवल्यावर ढगांनी पाठ... माती सावरत नाही 


तुला कंगाल म्हणते मी जरी श्रीमंत आहे तू

उपाशी माय असते पण तुला पाझर फुटत नाही



३.


एवढी नाही सहज पचणार मी

वेदनेवरला जरी उपचार मी


सोसल्यानंतर उन्हाची काहिली

सावलीचा घेतला आकार मी


द्यायची नाही विझू पणती मला

सोडले वाऱ्या, तुझे घरदार मी


मोगरा, जाईजुई काही नको 

आत आहे पेरला अंगार मी


घातल्या लाथा जगाने निर्दयी 

मारली त्याला मिठी अलवार मी 

.....................................................

No comments: