तीन गझला : भी. रा. पगारे

 





१.


दुःख मी का बरे आठवू सांगना?

व्यर्थ का वेळ मी घालवू सांगना?


संकटे ही उभी वादळासारखी

वेदना मी कशा साठवू सांगना?


रोजचा क्लेश मी जाळतो अंतरी

मी कसा रे कुणा हासवू सांगना?


तेच छळती मला मौन मी पाळता

खंत मी ही कुठे नोंदवू सांगना?


नित्य तालावरी नाचतो मी सदा

जाच हा मी कसा थांबवू सांगना?


२.


अन्याय लादलेला अंधार पाहिला मी

रक्तात माखणारा एल्गार पाहिला मी


कळपात एक झाली कमजोर वाटणारी

बलहीन जोडलेला विस्तार पाहिला मी


संबंध काय नाही पण श्रेय घ्यावया तो

वाचाळ बोलणारा लाचार  पाहिला मी


झेलीत मार होते सोसून वेदनांना 

दुबळ्यात जिंकण्याचा निर्धार पाहिला मी 


केला जुलूम ज्यांनी पाहून थक्क झाले 

म्हणती हळूच तेंव्हा झुंझार पाहिला मी


३.


लाख जळाले माझ्यावर मज जळता आले नाही

जगलो वनवा म्हणून निवांत मरता आले नाही


किती अपमान सहन केलीत थकली आता काया

दुःख अंतरी साठवताना हसता आले नाही


जपली होती नाती दुबळी काही फितूर दिसली 

जाणून सर्व कठोर मजला बनता आले नाही


निर्ढावलीत किती मुखवटे बेशरम होत गेली

निर्लज्जांच्या सुख सोहळ्यात रमता आले नाही


सांजसकाळी वैर कुणाचे मलाच कळले नाही

समोर बघता जेंव्हा त्यांना लढता आले नाही

................................................................


No comments: