तीन गझला : महेश देशपांडे

 




१.


पापण्यांच्या कोपऱ्याने ओल अडवावी पुन्हा

आतल्या माझ्या सरींना कैद वाटावी पुन्हा


परत यावे दर्शनाला पायरीपाशी तुझ्या

आरतीची धून देहातून वाजावी पुन्हा


या हवेचा माज इतका... बरसणारे पांगले

चातकाने पावसाला साद घालावी पुन्हा


अंगणाच्या कोपऱ्याने श्वास घ्यावा मोकळा

ढेकळांनी झाकलेली तुळस बहरावी पुन्हा


माणसाने आजवर झाडे हजारो तोडली

माणसाला सावलीची ओढ लागावी पुन्हा


कागदाची एक बाजू खास कोरी ठेवतो

तू लिहावे नाव माझे... हाक उमटावी पुन्हा


२.


कशास आता कळीस खुडतो, जाण तुला का नाही

ऋतू पाहु दे बहर एकदा हेतू दुसरा नाही


नाव तुझे अन् तुझेच चिंतन मनात कायम माझ्या

तुझ्या गुणांचा माझ्यामधला शोध संपला नाही


सीमेवरती पाट वाहिले रक्ताचे त्या नंतर

ठरली माती वांझ पिकाचा दाणा रुजला नाही


शंभर झाडे मोहरलेली जागेवर असताना

म्हणतो आपण इथला काही विकास झाला नाही


वीण उसवली नात्यांमधली वाढत गेले अंतर

क्षणात इतका गुंता झाला कधीच सुटला नाही


एकांताच्या भिंती साऱ्या होत्या तिथेच होत्या...

फितूर झाला एक कोपरा कुठेच दिसला नाही



३.


ऋतूंचे बहाणे किती मी सहावे

तरीही तुझ्या अंगणी मी फुलावे


तुझी एक तिरपी नजर ही पुरेशी

कुणीही बुडावे कुणीही तरावे


मनासारखी चाल व्हावी पटावर

असे सूत्र हातात काही असावे


तुझी सावली दूरवरच्या किनारी

उन्हाला इथे हे कुणी समजवावे


समजले मला एकटे चालताना

बरोबर कुणी आपल्याही असावे


खरे बोलती हे उसासे रिकामे

तुझे गंध श्वासास अजुनी सलावे


जपावे असेही कुठे काय बाकी

रिते कोपरे मज पुढेही दिसावे


विषय संपला एकदाचा म्हणालो

किती बारकावे तरीही उरावे

.......................................................

1 comment:

Anonymous said...

खूप भावपूर्ण.. सुंदर..!!