१.
घाबरत नाही प्रखर अंधारही जर दाटला
आणखी होतो प्रकाशित काजवा माझ्यातला
फुंकरीलाही कुणाच्या काल परवा भ्यायचे
आज ते आलेत वाऱ्याची दिशा बदलायला
ते दिवस नाहीत आता चांदण्या मोजायचे
घ्यायचे आभाळ हाती चांदण्या कोरायला
मी बदलल्याने बदल घडणार आहे केवढा?
काढुनी टाका प्रथमतः प्रश्न हा डोक्यातला
वैर संपुष्टात नाही आणता आले कधी
मग कसा कळणार त्याला गोडवा प्रेमातला
मी पणाला लावते माझ्यातली शालीनता
काढ तू हृदयातला मळ जेवढाही साचला
मनगटावर एवढा विश्वास आहे आमचा
परतुनी लावेन आले भाग्य जर भांडायला
२.
कोणत्या धुंदीत असतो पावसाळा
मोकळे आभाळ करतो पावसाळा
ढग जमा होतात आधी आठवांचे
कागदावर मग उतरतो पावसाळा
तू नको देऊस आमिष चांदण्यांचे
चांदण्या घेऊन फिरतो पावसाळा
स्वप्न जे बघतात डोळे पावसाचे
त्याच डोळ्यांतून झरतो पावसाळा
केवढे कारुण्य त्या थेंबात आहे
भूक विश्वाची शमवतो पावसाळा
बालपण कोठे हरवले बालकांचे?
फक्त काचेतून बघतो पावसाळा
या धरेला गंध नाही देत केवळ
या धरेचे सार जपतो पावसाळा
३.
माळ वा चुरगाळ मला
दे तुझे आभाळ मला
हात मी केलाय पुढे
दे तुझाही टाळ मला
मी दिले काळीज तुला
तू भलेही गाळ मला
फक्त तू दिसशील तिथे
तू कसेही चाळ मला
मोहिनी राहील तुझी
कर असे घायाळ मला
एवढी का ओढ तुझी?
व्हायचे ओढाळ मला
गुंतता वाढेल पुन्हा
पाहिजे तो जाळ मला
................................................

1 comment:
खूप छान गझल ताई
Post a Comment