१.
तू नसल्याने माझे असणे नसणे झाले आहे
दुःखासोबत रोजच बसणे उठणे झाले आहे
नवा मुखवटा लावत लावत जगणे शिकते आहे
कळू न देता खोटे खोटे हसणे झाले आहे
लाख चुका पोटात घातल्या इथेच चुकले सारे
मनातले मन केविलवाणे झुरणे झाले आहे
तुझ्या घराचा रस्ता शोधत शोधत येथे आले
ध्यासाचे बळ कसे शहाणे बघणे झाले आहे
दु:ख वाढले ताटामध्ये इलाज याला नाही
इतरांना सुख देणारे पण जगणे झाले आहे
२.
कुणाशी घ्यायचा पंगा बघूया वेळ आल्यावर
कसा दावायचा इंगा बघूया वेळ आल्यावर
असो सध्या जिथे आहे तुझ्या ताब्यात तर आहे
कुठे फिरवायची गंगा बघूया वेळ आल्यावर
कितीदा सोसले आहेत मी वाग्बाण लोकांचे
कुठे घालायचा दंगा बघूया वेळ आल्यावर
कितीही घ्या नवे कपडे कितीही दागिने घाला
कुणी आहे किती नंगा बघूया वेळ आल्यावर
किती चिंता समस्या या सदाच्या लागल्या मागे
कसा झटकायचा भुंगा बघूया वेळ आल्यावर
कलाने घ्यायचे सारे तिच्या ठरलेच जर आहे
किती घालायचा पिंगा बघूया वेळ आल्यावर
३.
रस्त्यावरच्या धावपळीला बघते आहे उंच इमारत
टिचभर पोटाच्या नखऱ्यावर हसते आहे उंच इमारत
झोपडपट्टी उठवत तेथे उभे राहिले टाॕवर मोठे
इथले तिथले मजले मोजत जळते आहे उंच इमारत
मोठ्या मोठ्या प्रशस्त खोल्या सुखसोयींची असते चंगळ
वेळ कुणा ना कोणासाठी कुढते आहे उंच इमारत
कुठे सुखाचे वाहे वारे कुठे विखरते सुख वाऱ्यावर
नियतीच्या साऱ्या खेळांना टिपते आहे उंच इमारत
भव्य इमारत अन् बाजूला पत्र्याची ही खोली दिसते
खुजे कोण हा विचार येता झुरते आहे उंच इमारत
.........................................................................

1 comment:
सुंदर!
Post a Comment