दोन गझला : रवीन्द्र जवादे

 



१.


एवढेसे दुःख कवटाळून जो तो

अन् सुखाच्या संभ्रमी भाळून जो तो.


प्रेम करते जन्म अवघा देखणासा

काळजा पण छान सांभाळून जो तो!


क्रौर्य होते राष्ट्रवादी देशभर अन्

जीव जगण्या बोलतो टाळून जो तो.


स्नेह ओलावाच असते विश्वभाषा

स्वार्थ घेतो चक्क पडताळून जो तो!


मीपणा हा आड येतो लाखवेळा

दोष देतो पण स्वतः टाळून जो तो.


जन्म जातो झाड होता एकजागी

फळफुलांनी मात्र गंधाळून जो तो.


२.


छानसा पाऊस यावा सांजवेळी

अन् मनाचा मोर व्हावा सांजवेळी.


ह्या दिशा गंधीत व्हाव्या पाखरांनी

अन् घुमावा धुंद पावा सांजवेळी!


मोतियांचे थेंब यावे पावसाळी

गाव सारा दर्वळावा सांजवेळी.


ह्या नदीची छान हळवी ती कहाणी

सागराचा भ्रम तुटावा सांजवेळी.


चांदणे यावे घनांच्या सोबतीला

चंद्रही पण मोहरावा सांजवेळी!


तू तुलाची  आठवावे नेमके अन्

मीच तेथे सापडावा सांजवेळी!

......................................................


No comments: