१.
दोघांचाही धर्मच लवचिक व्हावा आता
दोघांनाही करता यावा प्रेमावरती दावा आता
'जात बदलणे' पक्ष बदलण्याइतके सोपे व्हावे आता
कोणालाही, सहज कुठेही प्रवेश करता यावा आता
जो गेला तो झाला आहे झोपडपट्टीचा रहिवासी
वाड्यावरती वाट कुणाची नकोस पाहू गावा आता
जावा जावा रुसल्यानंतर, सहज बोलणे शक्यच नाही
खोटे खोटे भांडत आपण बोलत राहू भावा आता
युती एकदा झाल्यानंतर तक्रारींची चिंता कसली?
त्या दातांनी या ओठांचा खुशाल घ्यावा चावा आता
२.
कळतात फक्त रस्ते गूगल बघून आत्तम
दुनिया खरी समजते रस्त्यावरून आत्तम
केवळ तुलाच हिरवळ तो आणणार नाही
घेऊन बेडकांना येईल जून आत्तम
जाणून घेतल्याचा दावा नको करू तू
नाही स्वतःस सुद्धा कळला अजून आत्तम
तू राहिलास केवळ फोडत बदाम येथे
गेले असे तसेही टरफल विकून आत्तम
नसतात एक जैसे सारे अशोक, वामन
जोडू नकोस नाते नावावरून आत्तम
सारीच माणसेही जर माकडे बवनली
तर भांडतीत का मग जातीवरून आत्तम?
होईल शक्य काही भेटून बोलल्यावर
कळणे अशक्य आहे तितक्या दुरून आत्तम
केवळ सुगंध त्याची ओळख मुळीच नाही
अस्सल गुलाब कळतो काट्यावरून आत्तम
बिनधास्त छानपैकी घे तू जगून थोडे
काढून टाका दुनिया डोक्यामधून आत्तम
३.
जरी लांबून देतो मी शुभेच्छा वाढदिवसाच्या
मनापासून देतो मी शुभेच्छा वाढदिवसाच्या
अशी अनमोल वस्तू कोणती देऊ तुला दुसरी
हृदय देऊन देतो मी शुभेच्छा वाढदिवसाच्या
मला बोलावण्याआधी सवय जाणून घे माझी
मिठी मारून देतो मी शुभेच्छा वाढदिवसाच्या
पुढे सर्वांत आलो तर उगाचच व्हायची चर्चा
जरा थांबून देतो मी शुभेच्छा वाढदिवसाच्या
मला पाहून आठवल्या तुला जर मागच्या गोष्टी
विषय बदलून देतो मी शुभेच्छा वाढदिवसाच्या
कुणाला वेळ नसतो अन् कुणाला आठवण माझी
मला भेटून देतो मी शुभेच्छा वाढदिवसाच्या
.........................................................................
No comments:
Post a Comment