तीन गझला : सौ. निशा खापरे

 



१.


माहिती आहे सुखाची भेट क्षणभर असते,

त्याचसाठी केवढी ही रोज मरमर असते. 


खोल रुजले पाहिजे हृदयात नात्याचे बी,

त्याविना त्याचे बहरने फक्त वरवर असते.


काळजाला वेदनेने गोंदल्यावर कळते,

हेच जगणे तर खरोखर  खूप सुंदर असते.


चालताना टोचले काटे तसे मग कळले, 

या यशस्वी जीवनाची वाट खडतर असते.


संकटाला तोंड देते आत्मविश्वासाने,

तीच व्यक्ती शांत, सोशिक आणि कणखर असते. 


एक ओठी एक पोटी राहते हे ज्यांच्या,

बोलण्यामध्ये जशी शब्दांत साखर असते.


२.


छाटले तरी पंखांची या फडफड असते 

जगण्यासाठी सतत आपली धडपड असते


जोडत जाऊ चला माणसे आपुलकीने  

माणुसकीचा धर्म सोडणे अवघड असते


रोज हातचे चुकते मुकते काहीबाही

आवरताना मनात कायम गडबड असते


वादाअंती पाठ फिरवली ज्याने त्याने

भेटीसाठी उरात नुसती चडफड असते


गोड बोलणे सत्य लपवणे मला जमेना

म्हणून वाणी निर्भीड आणि परखड असते


३.


उठणे, बसणे दुर्मिळ झाले अंगणातले 

पोकळ झाले बंध माणसा-माणसातले


नाही पटला मनास सल्ला कधी कुणाचा

संस्कारांचे मूल्य संपले वागण्यातले


न संपणाऱ्या किती अपेक्षा मनात दडल्या 

उद्ध्वस्त होते समाधान जीवनातले


पूर्वी होता तसाच आहे मानव आता

फक्त संपले वात्सल्य असे काळजातले 


गंगेमध्ये धुतली सारी पापे तरीही

धुतले गेले पाप कुठे पण विचारातले


बोळवणीला थोडा हिस्सा दिला मुलीला

इतक्यासाठी वाद वाढले कुटुंबातले

............................................................



No comments: