१.
फाटका माणूस माझा चालतो आहे किती
दैववेड्या प्राक्तनावर हासतो आहे किती
राजवस्त्रे काढुनी ही फेकुनी आहे दिली
हाय चिंध्या पांघरोनी फाटतो आहे किती
उंच गगनी उधळुनी हातातली पिवळी फुले
बाभळीच्या कंटकावर नाचतो आहे किती
रेशमी नात्यातला हा रेशमाचा फास या
कापल्या गेल्या गळ्याला काचतो आहे किती
चालताना लक्तरे झालीत पायांची तरी
पाय तुटका दलदलीतच घालतो आहे किती
रोज लावूनी कपाळी चंदनाची तीट ही
खाक झाल्या काळजाला जाळतो आहे किती
२.
अश्रूंनी का केली सोबत सदा उशाला
अजून कळले नाही माझ्या खुळ्या मनाला
कोनाड्याने कोनाड्याला सवाल केला
कुणावाचुनी कसा एकटा जन्म निघाला
छपरावरती होता नाचत पाउस वेडा
छपराखाली अश्रूंचा पण निचरा झाला
डोळे उघडे ठेव जरा तू दिसेल तुजला
सूर्य पहाण्या दिवा अभाग्या हवा कशाला
डोळे भरले गदगद झाली जीव विव्हळला
लेक निघाली हृदयावरती पडला घाला
ह्याने त्याने त्याने ह्याने सांगितल्यावर
भव्य तुकोबा तिळा एवढा मला कळाला
इतके झाले तुला पाहुनी अखेर बुद्धा
माझ्यामधला वसंत शिंदे दूर पळाला
३.
खूप व्यस्त राहतोस आजकाल तू
सांग काय वाचतोस आजकाल तू?
सांगतोस तू कशी हरेक बातमी?
काय काय पाहतोस आजकाल तू
बोलतोस तू किती जरा न थांबता
दूरचित्र वाटतोस आजकाल तू
पाहुनी तुला खरेच लाज वाटते
पाय फार चाटतोस आजकाल तू
गडबडीत नेहमी सदाच राहतो
का जरा न थांबतोस आजकाल तू?
लागता जुगार फार बदललास तू
वेगळाच वागतोस आजकाल तू
लागतील द्यायला परत म्हणून का
पाहताच टाळतोस आजकाल तू?
.......................................................

No comments:
Post a Comment