१.
त्याच्याच सोबतीने बहरेन बारमाही
वाट्यास दुःख आले सोसेन बारमाही
जखमांतही उमलण्याची जिद्द रोज माझी
काट्यात जन्म झाला रूजेन बारमाही
आघात काळजावर होतील लाख माझ्या
आणून हास्य ओठी झेलेन बारमाही
अंधार भोवताली दाटून फार येई
होऊन दीप मीही उजळेन बारमाही
द्वेषात अर्थ नाही, जाणून घेतले मी
प्रेमात रंगुनी मी बोलेन बारमाही
२.
जिंदगीचे शल्य हृदयी फार बोचत राहते
एक नस दुखरी मनाची दाह सोसत राहते
बाप माझा बारमाही झेलतो ते ऊन अन्
संयमाच्या विस्तवावर माय पोळत राहते
अन्न दिवसा फार वाया जात असते नेहमी
रात्र उघड्यावर भुकेची आग झेलत राहते
पूर्ण झाले वाटताना फार बाकी भासते
राहिलेली एक इच्छा खूप टोचत राहते
कालची सीता असो की रुख्मिणी वा राधिका
आजसुद्धा एक 'सीमा' दुःख भोगत राहते
३.
आत कोलाहल मनाच्या माजला आहे
शांततेचा श्वास कोणी रोखला आहे?
बाप आहे चालला जो भार घेऊनी
वेदनांनी जीव त्याचा वाकला आहे
भारताच्या संविधानाचा विसर पडला
लोकशाहीचा गळाही दाबला आहे
कायद्याचा अर्थ आता बदलला आहे
न्यायही पैशांत येथे मोजला आहे
बुद्ध होऊनी बघावे माणसांनी या
शांततेचा मार्ग कोणी पाळला आहे?
सत्य, नीती, न्याय यांना चाळताना
ढोल नुसता घोषणांचा वाजला आहे
थेट सत्तेला विचारत प्रश्न जो आहे
तोच वारंवार येथे भाजला आहे
.......................................................

No comments:
Post a Comment