तीन गझला : राहुल शंकर साळवे




१.


वाटेत ह्या यशाच्या गळतात लोक काही

पाहून संकटांना पळतात लोक काही


गेली हयात सारी मज गाठले न त्यांनी

पाहून वेग माझा जळतात लोक काही


मोर्चात बोलले जे लेकीस वाचवावे

वाटेत ते कळ्यांना छळतात लोक काही


कामात लाज कसली पोटात आग असता

उमजून हे पकोडे तळतात लोक काही


लावून मुखवटा ते फिरतात रोज हल्ली 

दुःखात नेमके अन् कळतात लोक काही

     

२.


मंदिर, मशीद, दर्गा, बांधू नका विहारे

माणूस फक्त घडवा वाटून ग्रंथ सारे


ठेवा करून आता, पेटंट आमचेही

आलेत चोर काही, बापास पळवणारे


भगवा निळा नि हिरवा, भांडू नका कुणीही

जातीत फूट पाडे, येवो कितीक वारे


मागू नकोस काही, हातात काम नाही

खुर्चीत आज नाही, ज्यांचे दिलेत नारे


मतदार तूच राजा सांभाळ लोकशाही

मातीत गाड सारे नेते लुबाडणारे


३.


घालतो मी माणसाला आज थोडी साद आता

जातपातीचा बरा नाही उगी तो वाद आता


दंग झाले आज कारे एकमेकां भांडताना

ओतणारे तेल आगी ओळखावी ब्याद आता


तोडफोडीने इथे कीती खचूनी चूर झाले

दीप नेऊ सावराया चेतवू संवाद आता


वार केले दोष सांगा काय होती चूक भारी

वीझवूनी आग देऊ एकमेकां दाद आता


पेटवूनी दंगली ते झाकती रे घोळ मोठे

ओळखूनी डाव खोटा सोड तूही नाद आता


दूर गेले पेटवूनी साधती ते डाव राजा

फायदा नाही तुझा काही उरे बरबाद आता


बोध घे राहूल तू होवो न दंगे जातवारी

माणसाची जात भारी पेर हा संवाद आता

.............................................................

No comments: