तीन गझला : स्नेहलता झरकर-अंदुरे

 




१.


एक आशा रोज मारत राहिले

अन् नवी दररोज प्रसवत राहिले


जायचे होते सरळ निर्जन स्थळी

ओळखीची वाट शोधत राहिले


पूर्ण केली परिचितांची वर्तुळे

मी मला त्यांतून वगळत राहिले


झाड नव्हते एकही दारामधे

पिंजऱ्याचे दार उघडत राहिले


पोषणाविन वारल्या इच्छा जुन्या

मन नव्यांना घास भरवत राहिले


राहिली उघडी कवाडे मागची

फाटकावर लक्ष ठेवत राहिले


ऐकले मी, हा असा अन् ती तशी

मग मला नुसतीच चाळत राहिले


चंद्र सूर्याला कुठे ती लाभते?

सावलीची दृष्ट काढत राहिले


२.


कुठे मागते रिमझिमणारा श्रावण

दिलाच आहे ग्रीष्म मला तू आंदण


ठोस पुरावे सुद्धा ठरले क्षुल्लक

मिटले होते प्रेमाने ते भांडण


घरट्याला तर जागा नाही उरली

मिळेल का त्याला एखादी वळचण


प्रेमाला मौनाची भाषा कळते

नकोच असते शब्दांचीही अडचण


टाळत आले आडवणारे जर-तर

समोर आहे उभा तरीही हा ... पण


कसेबसे मग झाड जुनेही तगते

एक कोपरा देते जेंव्हा अंगण


टिकेल का नुसत्या घाग्याने नाते?

नसेल त्याला जर प्रेमाचे कोंदण 



३.


कोंडून ठेवल्याने कुढल्या मनात इच्छा

मिळताच वाव थोडा फुलल्या मनात इच्छा


सुंदर नव्या झग्यासह दिसताच छान गजरा 

घेऊन एक गिरकी नटल्या मनात इच्छा


बोलूनही तुला तर कळले कधीच नाही 

निःशब्द होत सगळ्या झुरल्या मनात इच्छा


ऐकून आळसाच्या गोष्टी सदा सशाच्या

धावायच्या अगोदर हरल्या मनात इच्छा


येऊन कोरडेपण नाती दुरावली पण

नातीस पाहिल्यावर भिजल्या मनात इच्छा 


'व्हा पेरते' म्हणाला जेंव्हा सुरात पक्षी

आनंद घेत त्याचा रुजल्या मनात इच्छा


गावामधील वर्दळ झाली विरळ अताशा

पाहून पार पडके रडल्या मनात इच्छा

..........................................................

No comments: