तीन गझला : डॉ.अर्चना जुनघरे-पोटे




१.


लबाड आणिक खोट्या बाता नकोच सांगू 

अधोगतीच्या फसव्या वाटा नकोच सांगू


कालच दंगा करुनी आला कळले आहे 

भाषणात तू भाईचारा नकोच सांगू 


फूल दिले तर गाल गुलाबी झाले होते 

गुलाबातला रुतला काटा नकोच सांगू


धुळीत गेली दिली घेतली कितीक वचने 

पुन्हा नव्याने आणाभाका नकोच सांगू 


ठेच लागली, कळले आहे जीवन आता 

तोच पुन्हा तू जुनाट रस्ता नकोच सांगू


२.


काळोखाशी कट्टी करते एक बाहुली

पुनव चांदणे घरी आणते एक बाहुली


दमले थकले जरी कितीही तनामनाने

गोड मुक्याने ताजे करते एक बाहुली


आजाराने पछाडले जर मला कधी तर

डॉक्टर आणिक आई बनते एक बाहुली


मरगळ चिडचिड क्षणात सारे पळून जाते

हळूच जेव्हा कुशीत शिरते एक बाहुली


गतजन्माचे पुण्य असावे ज्याचे त्याचे

म्हणून त्यांच्या घरी जन्मते एक बाहुली



३.


कधी येणे कधी जाणे, तुझी ना वेळ ठरलेली

तरीही सांज होताना, नजर दारात खिळलेली


जरासी ठेच लागुनही, तिचा तो केवढा टाहो

उसळली तर नसावी ना, व्यथा मौनात दबलेली?


जरासी लावली ठिणगी चितेने घेतला भडका

मनाच्या आत होती का तिची इच्छा न विझलेली?


तुम्ही लावा मलम अथवा करा उपचारही सारे

कुठे लवकर बरी होते जखम हृदयात लपलेली


जगाशी वागताना मी अताशा ठेवते अंतर

दगा देतात सोयीने कधी अपुलीच असलेली

.................................................................

No comments: